औरंगाबादहून रेल्वेंची संख्या वाढली, मुंबई मार्गावर सर्वाधिक गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 05:39 PM2021-08-10T17:39:28+5:302021-08-10T17:46:39+5:30
Aurangabad Railway Station : सर्वप्रथम १ जून २०२० रोजी सचखंड एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत अन्य रेल्वे सुरू करण्यात आल्या.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : लाॅकडाऊनमुळे कधी नव्हे इतकी शांतता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ( Aurangabad Railway Station ) अनुभवास आली. मात्र, अनलाॅक होताच एक-एक रेल्वे सुरू होत गेली. आजघडीला औरंगाबादहून दररोज, साप्ताहिक, द्विसाप्ताहिक, आठवड्यातून तीन दिवस आणि पाच दिवस धावणाऱ्या अशा २४ रेल्वेंची ये-जा होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रवाशांची संख्याही वाढली असून, मुंबई मार्गावर सध्या सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. ( The number of trains increased in Aurangabad)
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लाॅकडाऊन लावण्यात आल्याने देशभरातील सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल दोन महिन्यांनंतर सर्वप्रथम १ जून २०२० रोजी सचखंड एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत अन्य रेल्वे सुरू करण्यात आल्या. औरंगाबादमार्गे धावणाऱ्या २४ पैकी ११ रेल्वे या रोज धावतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रवाशांची संख्याही ( Railway Passenger ) वाढली आहे. त्यामुळे रेल्वे येण्याच्या वेळेत प्लॅटफाॅर्म पुन्हा एकदा प्रवाशांनी भरलेले पाहायला मिळत आहे. प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्रीही वाढली आहे.
या रेल्वेंना प्रवाशांची गर्दी
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सध्या सर्वाधिक गर्दी ही मुंबईच्या रेल्वेंना होत आहे. तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. सचखंड एक्स्प्रेसलाही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची सध्या कोरोना चाचणी केली जाते.
रोज ३०० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री
कोरोना प्रादुर्भावामुळे काही कालावधीत प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री सुरू करण्यात आली असून, दररोज ३०० तिकिटांची विक्री होत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष, सोशल डिस्टन्स अशक्य
रेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्स पाळणे प्रवाशांना अशक्य होत आहे. रेल्वे आल्यावर बोगीत चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची एकच गर्दी होते. कोरोना प्रादुर्भावाची पर्वा न करता अनेक जण मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले.
तोंड धुण्यासाठी मास्क काढला
परभणीवरून औरंगाबादपर्यंतचा प्रवास रेल्वेने केला. रेल्वेतून उतरल्यानंतर तोंड धुण्यासाठी मास्क काढला. लगेच मास्क लावला.
- विशाल भंडारे, प्रवासी
रेल्वे प्रवासात मास्क मिळावा
घाईगडबडीत मास्क कुठेतरी पडला. प्रवासात मास्क मिळण्याची कुठेही सुविधा दिसून आली नाही. प्रवासात मास्क मिळाला पाहिजे.
- एक प्रवासी
सध्या सुरू असलेल्या रेल्वे :
- सचखंड एक्स्प्रेस
- नंदीग्राम एक्स्प्रेस
- देवगिरी एक्स्प्रेस
- जनशताब्दी एक्स्प्रेस
- तपोवन एक्स्प्रेस
- अजंता एक्स्प्रेस
- रेणीगुंठा एक्स्प्रेस
- मराठवाडा एक्स्प्रेस
-नांदेड-राेटेगाव डेमू
- औरंगाबाद-हैदराबाद विशेष रेल्वे