वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले
By Admin | Published: June 21, 2015 12:16 AM2015-06-21T00:16:09+5:302015-06-22T00:18:26+5:30
पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात दिवसाढवळ्या वन्य प्राण्याची हत्या केली जात आहे. तसेच या प्राण्यांचे मांस ग्राहकांना घरपोच देत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात दिवसाढवळ्या वन्य प्राण्याची हत्या केली जात आहे. तसेच या प्राण्यांचे मांस ग्राहकांना घरपोच देत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र, याबाबत वनविभाग अनभिज्ञ असून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होताना दिसत आहे.
तालुक्यातील पिंपळगाव परिसर हा दाट जंगलवस्तीचा परिसर आहे. यावर आता पावसाळ्याच्या तोंडावर वन्यप्राणी या जंगलात वास्तव्य करीत असतात. यामध्ये हरिण, रानडुकर, तितर, घोरपड, ससे, मोर आदी प्राणी या वन विभागात वावरत असतात. मात्र या परिसरात शिकारी वर्गाने डोके वर काढले असून हे शिकारी दिवसाढवळ्या या प्राण्यांना जाळ्यात अडकवून त्यांची शिकार करीत आहेत. शिकारी फक्त शिकारच करीत नाहीत, तर त्या प्राण्याची इतर भागात विक्री देखील करु लागले आहेत. दिवसेंदिवस मांस विक्रीची संख्या वाढत चालली आहे. ज्या प्राण्याची शिकार करण्यात येते, त्याची माहिती गावातील एजंटमार्फत ग्राहकांना देण्यात येते. तसेच मारलेल्या प्राण्याचे मांस गावात मोबाईलद्वारे संपर्क करुन घरपोच डिलेव्हरी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. प्राण्यांच्या मांस विक्रीतून अनेकांना पैसे कमावण्याचे साधन निर्माण झाले आहे.
पिंपळगाव रेणुकाई, पारध, रेलगाव, कोठा कोळी आदी भागात वन्यप्राण्यांच्या शिकारी जर अशाच चालू राहिल्या तर या भागातील वन्य प्राण्याची संख्या कमी होण्याच्या मार्गावर आहे. याकडे वनविभागाने लक्ष देवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, गत काही वर्षात परिसरात वृक्षतोडी तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढत आहे. या प्रकाराकडे तहसील तसेच वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांची शिकार थांबवावी, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे. (वार्ताहर)