२००५ पासून वाढतेय महिला पोलिसांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:23 AM2018-02-03T00:23:11+5:302018-02-03T00:23:20+5:30
पोलिसांचे क्षेत्र हे फक्त पुरुषांसाठीच असते. महिला त्या क्षेत्रात टिकाव धरू शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी सर्रास बोलले जायचे. आजही काही लोकांचा हा समज आहे. मात्र २००५ पासून महाराष्ट्र पोलीस, वनरक्षक, रेल्वे पोलीस या क्षेत्रांमध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय वाढली असल्याचे दिसून येते. यामध्येही ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण अधिक आहे.
ऋचिका पालोदकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोलिसांचे क्षेत्र हे फक्त पुरुषांसाठीच असते. महिला त्या क्षेत्रात टिकाव धरू शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी सर्रास बोलले जायचे. आजही काही लोकांचा हा समज आहे. मात्र २००५ पासून महाराष्ट्र पोलीस, वनरक्षक, रेल्वे पोलीस या क्षेत्रांमध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय वाढली असल्याचे दिसून येते. यामध्येही ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण अधिक आहे.
२०१५ साली झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात सर्वात जास्त महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासनाने पोलीस दलात महिलांना देऊ केलेले तीस टक्के आरक्षण हा यामागचा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगतात. मात्र नोकरी मिळाल्यानंतरही महिलांमध्ये मुळातच असलेली जिद्द आणि कामाप्रतीची निष्ठा, यामुळे या क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा जास्त टिकाव धरू शकतात, असे बोलले जाते. महाराष्ट्रातील महिला पोलिसांचे प्रमाण एकूण पोलीस संख्येच्या १०.४८ टक्के एवढे आहे. यातही महिला पोलीस अधिकाºयांपेक्षा पोलीस कर्मचाºयांंची संख्या अधिक आहे. हे गुणोत्तर १:२३ एवढे जास्त आहे. पोलिसांची नोकरी त्रासदायक असते, वेळा निश्चित नसल्याने महिला ती नोकरी करून कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही. प्रचंड धावपळ असल्याने महिलांना पोलीस क्षेत्रात काम करणे अवघड जाते, त्यामुळे अनेकदा पालकही आपल्या मुलीला या क्षेत्रात येऊ देण्यासाठी फारसे खुश नसतात. मात्र आता आत्मविश्वासपूर्वक कार्य करणाºया महिला पोलिसांकडे पाहून अनेक पालकांचे आणि युवतींचे मतपरिवर्तन होत असून, या क्षेत्रातील युवतींची संख्या वाढते आहे.
महिलांसाठी उत्तम करिअर
मागच्या काही वर्षांपासून पोलीस दलात भरती होणाºया महिलांचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. या क्षेत्रात काम करणाºया महिलांकडे पाहून हे क्षेत्र दिसते तेवढे खडतर नसल्याचे मुलींना कळते. त्यामुळे त्यांच्या मनातील गैरसमज साहजिकच दूर होतो. महिलांसाठी हे एक चांगले क रिअर ठरत आहे.
- वैशाली धाटे- घाटगे, पोलीस उपायुक्त
ग्रामीण भागातील मुली अव्वल
ग्रामीण भागातील अनेक मुली आज महिला पोलीस म्हणून सक्षमपणे कार्य करीत आहेत. शारीरिक श्रम करण्याची सवय असल्यामुळे शहरी मुलींपेक्षा ग्रामीण भागातील मुली अधिक काटक असतात. त्यामुळे निवड प्रक्रियेदरम्यान असलेल्या शारीरिक क्षमता चाचणीत फारसे श्रम न घेताही त्या अव्वल ठरतात. या क्षेत्रात अजूनही मुलींना भरपूर वाव आहे.
- वैशाली पाटील, संचालिका, पोलीस- सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था