परिचारिकांवर गुन्हा दाखल करण्याचे षड्यंत्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:38 AM2017-08-01T00:38:32+5:302017-08-01T00:38:32+5:30
मागील काही दिवसांपासून डॉक्टर व परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे जिल्हा रुग्णालय चर्चेत आहे. अशातच ४ परिचारिकांवर खोटा गुन्हा दाखल करण्याचे षड्यंत्रच रचले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील काही दिवसांपासून डॉक्टर व परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे जिल्हा रुग्णालय चर्चेत आहे. अशातच ४ परिचारिकांवर खोटा गुन्हा दाखल करण्याचे षड्यंत्रच रचले जात आहे. हे खोटे गुन्हे रद्द करावेत, या मागणीसाठी परिचारिका आक्रमक झाल्या आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून त्यांनी आपली कैफियत मांडली आहे.
शहरातील भारती विश्वास वडमारे ही महिला प्रसुतीसाठी मे महिन्यात जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्र. २ मध्ये दाखल झाली. तिच्यावर उपचार करून तिला सुटी देण्यात आली. महिन्यानंतर या महिलेने आपल्या हातात सुई राहिल्याचे सांगितले. यामध्ये डॉक्टर, परिचारिकांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप वडमारे यांनी केला होता. याचा तपास एएसआय गांधले यांनी केला. यामध्ये परिचारिका दोषी असल्याचे दिसताच गांधले यांनी मनीषा गायकवाड, अर्चना गायकवाड, अलका मुनी, मंदा महामुनी यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा शहर पोलिसात गुन्हा दाखल केला; परंतु या प्रकरणाची चौकशी अद्यापही सुरू आहे. गांधले यांनी वडमारे यांच्याशी संगनमत करून परिचािरकांवर खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप संघटनेने निवेदनातून केला आहे.
गांधले व वडमारे यांनी परिचारिकांकडे पैशाची मागणी केल्याचा आरोपही संघटनेने निवेदनाद्वारे केला आहे. वास्तविक पाहता या प्रकरणात परिचारिका दोषी नसतानाही जाणूनबुजून गुन्हा दाखल केल्याचा आरोप संघटनेने केला
आहे.