घाटी रुग्णालयात परिचारिकांनी पुकारले कामबंद आंदोलन; आश्वासनानंतर २ तासात पुन्हा कामावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 11:20 AM2021-08-25T11:20:58+5:302021-08-25T11:33:26+5:30
घाटी रुग्णालयात औषधीटंचाई, वार्डात चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांचा अभाव, यामुळे रुग्णसेवा देताना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात आज परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे सकाळीच रुग्णसेवा विस्कळीत झाली. घाटी रुग्णालय प्रशासनाने धाव घेत परिचारिकांबरोबर संवाद मागण्यांसंदर्भात आश्वासन दिले. त्यामुळे २ तासांनंतर संप मागे घेण्यात आला.
घाटी रुग्णालयातील औषधीटंचाई, वार्डात चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांचा अभाव, यामुळे रुग्णसेवा देताना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाला वारंवार सांगूनही हे प्रश्न सुटत नसल्याने परिचारिका संघटनेने आज सकाळी ७.३० वाजेपासून कामबंद आंदोलन पुकारले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. श्रीनिवास गडप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. काशिनाथ चौधरी, डॉ. विकास राठोड यांनी धाव घेत परिचारिकांबरोबर संवाद साधला.
आगामी १५ दिवसांत परिचारिकांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन घाटी प्रशासनाने दिले. त्यामुळे कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे परिचारिका संघटनेतर्फे सांगण्यात आले. यावेळी शासकीय परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा शुभमंगल भक्त, सचिव इंदुमती थोरात, इतर पदाधिकारी द्रौपदी कर्डीले, महेंद्र सावळे, मकरंद उदयकार, नवाज सय्यद आदींची उपस्थिती होती.