परिचारिका, सेवकांकडून रुग्णसेवा
By Admin | Published: May 17, 2017 12:19 AM2017-05-17T00:19:25+5:302017-05-17T00:26:54+5:30
येडशी : सोलापूर- औरंगाबाद या राष्ट्रीय तर बार्शी- लातूर या रज्य महामार्गावर वसलेल्या येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते़
लोकमत न्यूज नेटवर्क
येडशी : सोलापूर- औरंगाबाद या राष्ट्रीय तर बार्शी- लातूर या रज्य महामार्गावर वसलेल्या येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते़ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत परिचारिका व सेवकांनीच रुग्णांवर प्रथमोपचार केले़
येडशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ११ गावाचा समावेश आहे़ उपळा, कुमाळवाडी, आळणी ही उपकेंद्र आहेत़ तर जवळा उपकेंद्र सुरू होणार आहे़ कळंब तालुक्यातील ८ ते १० गावे येडशी जवळ असल्याने तेथील रुग्णही उपचारासाठी येडशी येथे येतात. राष्ट्रीय, राज्य मार्गावरील अपघातग्रस्तांना प्रथमोपचारासाठी येथेच आणले जाते़ प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ पदे मंजूर असून, तीन पदे रिक्त आहेत. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना एकच कार्यरत आहेत़ डॉ़ झेड़ ए़ पटेल हे वैद्यकीय रजेवर आहेत़ सध्या ईटकूरचे डॉ़ वाघमोडे हे काम पहात आहेत़ आरोग्य सेविकाची २ पदे व आरोग्य सहायकाचे एक पद रिक्त आहे. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर अंकूश नाही़ तर बायोमट्रीक मशीन बंद असून, ती सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत आहे़ गत काही दिवसापूर्वी पंस सदस्य संजय लोखंडे यांनी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला होता़ त्यावेळी गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केली नाही़ अनेकवेळा कर्मचारी वीज बंद करून गेटला कुलूप लावून झोपी जातात़ त्यामुळे दवाखाना सुरू आहे की बंद ? हेच रात्रीच्यावेळी समजत नाही़
या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाची सोमवारी रात्री ७ ते ११़३० या वेळेत पाहणी केली असता रुग्णांच्या गैरसोयीचे प्रकार समोर आले़ डॉक्टर नसल्याने आरोग्य सेविका पी़ए़पारडे व शिपाई पाडूरंग ठोकळे यांनीच येणाऱ्या रुग्णांवर उपचार केले़ येडशी येथील जनार्दन दत्तू नागटिळक हे वयोवृद्ध नागरिक अचानक चालता येत नाही म्हणून तर शिवाजी पांडुरंग गाढवे (रा वडगाव ताक़ळंब) हे पायाला जखम झाल्याने उपचारासाठी आले होते़ तर आकाश तानाजी पवार (लमाण तांडा), विनायक शकंर धोगडे (रा वाघोली) राणी अभिमन्यू जाधव (रा जवळा) यांना छातीत दुखत असल्याने उपचारासाठी आणले होते़ महेश सूतार (रा़ शेलगाव ज.) व कमलेश निसार यांना गाडीवरून पडल्याने रात्री ११ वा उपचारासाठी आणण्यात आले होते़ या सर्वांवर कर्मचाऱ्यांनीच उपचार केले़ एखादा गंभीर आजाराचा किंवा अपघातासारखा प्रसंग ओढावला तर रात्री डॉक्टर नसतात़ त्यामुळे येथे कायम डॉक्टरांची नियुक्ती करणे आवश्यक आहे़