मान्यता नसताना नर्सिंग प्रवेश : फसवणूक करणारा संस्थाचालक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 04:02 PM2019-07-10T16:02:07+5:302019-07-10T16:10:42+5:30

पैसे परत मिळवून देण्याची पालकांची पोलिसांकडे मागणी

Nursing admission without approval: cheating institution holder arrested | मान्यता नसताना नर्सिंग प्रवेश : फसवणूक करणारा संस्थाचालक अटकेत

मान्यता नसताना नर्सिंग प्रवेश : फसवणूक करणारा संस्थाचालक अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्देनर्सिंगच्या विद्यार्थिनींची तक्रार पोलीस ठाण्यात पालकांची गर्दी

औरंगाबाद : राज्य शासनाची जीएनएम या नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असल्याची थाप मारून ४१ विद्यार्थिनींना हजारो रुपयांना लुटणाऱ्या स्वयंघोषित संस्थाचालक सुभाष पाटीलसह अन्य एका  महिलेवर विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाटील याला बेड्या ठोकल्या आहेत. 

सुभाष पाटील याने क्रांतीचौक परिसरात अदालत रोडवर आरोग्यसेविका ग्रुपतर्फे नर्सिंग स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र या नावाने क्लासेस सुरू केले. नर्सिंग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना केंद्र, राज्य आणि जिल्हास्तरीय आरोग्यसेवक, सेविका, अधिपरिचारिका पदभरतीचे परीक्षापूर्व तयारी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. याठिकाणीच नर्सिंगच्या जीएनएम अभ्यासक्रमाला शासनाची मान्यता मिळाली असून, प्रवेश देण्यात येत असल्याची थापही सुभाष पाटील नामक संस्थाचालक इच्छुक उमेदवारांना मारत होता.

मागील वर्षीच या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींकडून पैसे उकळण्यात आले होते. यासाठी पावती बुक छापून पैसे भरल्याची पावतीही देण्यात येत होती. मागील वर्षी विद्यार्थिनींना परीक्षेच्या वेळी आपले महाविद्यालय नवीन असून, उशिराने नोंदणी केली असल्यामुळे परीक्षा देता येणार नसल्याची थाप मारली होती. २०१८-१९ या वर्षामध्ये वर्षभर प्रवेश देण्यात आले. विद्यार्थिनींना तासिका करण्याची गरज नाही. आपण जेथे छोटी-मोठी नोकरी करता ती करूनही परीक्षा देता येईल. फक्त रविवारी अभ्यासक्रमांना येत जा, अशा सूचना या संस्थाचालकाने केल्या होत्या. रविवारी तासिकांना आल्यावर स्पर्धा परीक्षांना जे शिकविण्यात येत होते. त्याच तासिकांना बसविले जाई. जीएनएम अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर अर्जही भरून घेण्यात आले. तसेच परीक्षा ९ तारखेपासून सुरू होणार असून, ८ तारखेला हॉल तिकीट घेऊन जा, अशा सूचना केल्याचे विद्यार्थिनींनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ४१ विद्यार्थिनींकडून ५० हजार, ३० हजार, १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळली असल्याची माहिती पोलिसांनी  दिली. जनहित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, जनहित नर्सिंग महाविद्यालयाला शासनाची मान्यता आहे का? अशी माहिती पोलिसांनी वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून मागविली होती. डॉ. लहाने यांनी नर्सिंग महाविद्यालयाला मान्यता नसून महाविद्यालयाचा प्रस्तावही दाखल नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट नोंदणी करणाऱ्याच्या नावाखाली गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस ठाण्यात पालकांची गर्दी
नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवून हजारो रुपयांची फसवणूक केलेला संस्थाचालक सुभाष पाटील यास पोलिसांनी ठाण्यात आणल्याची माहिती होताच विद्यार्थिनींसह पालकांनी गर्दी केली होती. फसवणूक केलेल्या संस्थाचालकाकडे जमा असलेल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रती आणि दिलेले पैसे परत मिळवून देण्याची मागणी पालकांनी केली.४ यावेळी पालकांची संतप्त भूमिका दिसल्यामुळे पोलिसांनी संस्थाचालकाला संरक्षणात क्लास सुरू केलेल्या ठिकाणी घेऊन जात चौकशी केली. दरम्यान, या संस्थाचालकाने यापूर्वीही बी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Nursing admission without approval: cheating institution holder arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.