पोषण आहार कामगारच उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:38 AM2017-10-25T00:38:32+5:302017-10-25T00:41:06+5:30
माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्याचे काम करणा-या मदतनिसांचे मानधन अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही मिळालेले नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्याचे काम करणा-या मदतनिसांचे मानधन अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही मिळालेले नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत या कामगारांना उसनवारी करावी लागली. पोषण आहाराचे मानधन कायम विलंबाने मिळत असल्यामुळे या कामगारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
विद्यार्थ्यांना शाळेतच पोषक आहार मिळावा यासाठी शासनाकडून माध्यान्ह भोजन योजना राबवली जाते. जिल्ह्यातील एक हजार ९०६ शाळांमध्ये पहिली ते चौथी व पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाते. पोषण आहार शिजविण्याचे काम मदतनीस प्रामाणिकपणे अखंडित करत असले तरी त्यांचे मानधन मात्र कधीच वेळेत मिळत नाही. जून महिन्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आता आॅक्टोबर उलटला आहे.
शिक्षण विभागातील सर्व यंत्रणांचे पगार नियमित होत असले तरी पोषण आहार शिजविणाºया मदतनिसांना गत सहा महिन्यांपासून छदामही मिळालेला नाही. पोषण आहाराची खिचडी शिजविण्यासाठी लागणा-या इंधन, भाजीपाल्याचा खर्चही या कामगारांना करावा लागत असल्याने पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न या कामगारांसमोर आहे. काही शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी दिवाळीत पदरमोड करून पोषण आहार कामगारांना मदत केली.
मात्र, बहुतांश कामगारांनी उधारी-उसनवारी करत दिवाळी साजरी केली. शिक्षण विभागाच्या संबंधित विभागाचे अधिकारी शालेय स्तरावरून बिले वेळेत मिळत नसल्यामुळे पोषण आहाराची देयके काढण्यास उशीर होतो, असे सांगत आहेत. तर बिले वेळेत सादर करूनही या कामगारांचे मानधन वेळेत काढले जात नाही, असे शालेय स्तरावरून सांगण्यात येत आहे. या टोलवा-टोलवीमध्ये पोषण आहार शिजविणाºया कामगारांचे मानधन देण्यास कायम विलंब होत आहे. दरम्यान, पोषण आहार कामगारांचे जून व जुलै महिन्याचे मानधन शाळेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्याचे जे.डी. राऊत यांनी सांगितले.