वैद्यकीय शिक्षणासाठी औरंगाबादेत पोषक वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:04 AM2021-07-01T04:04:27+5:302021-07-01T04:04:27+5:30
सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा देणारे शहर म्हणून राज्यात आता पुण्या- मुंबईपाठोपाठ औरंगाबादही ओळखले जात आहे. या शहराने अवयव रोपणामध्येही ...
सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा देणारे शहर म्हणून राज्यात आता पुण्या- मुंबईपाठोपाठ औरंगाबादही ओळखले जात आहे. या शहराने अवयव रोपणामध्येही आघाडी घेतल्याचे आपणास ठाऊकच आहे. दर्जेदार व गुणवत्ताप्रधान वैद्यकीय शिक्षणासाठीही हे शहर देशभरात लौकिकास पात्र ठरले आहे.
औरंगाबादेत वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या एक शासकीय व एक खाजगी अशा दोन मोठ्या संस्था कार्यरत आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व दुसरे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय यांचा समावेश आहे. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे १९५६ मध्ये सुरू झाले असून, राज्यातील प्रमुख वैद्यकीय संस्था म्हणून हे महाविद्यालय गणले जाते. या महाविद्यालयात ‘एमबीबीएस’साठी दरवर्षी २०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. याठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचीही (एमडी, एमएस) चांगली सुविधा असून, यासाठी १८५ विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. याशिवाय सुपर स्पेशालिटीमध्ये सर्जिकल ब्रँच समजली जाणारी सर्जिकल अंकॉलॉजी (एमसीएच) आणि डीएम इन न्युओनेटॉलॉजी या अभ्यासक्रमांचीही येथे सुविधा उपलब्ध आहे. एवढेच नव्हे, तर बीएस्सी नर्सिंग, मेडिकल प्रयोगशाळा तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम (डीएमएलटी), बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी (बीपीएमटी) आदींचेही अभ्यासक्रम चालविले जातात. या संस्थेतून पदवीधर व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक डॉक्टर, तंत्रज्ञ, परिचारिका आज भारताबरोबर विदेशातही वैद्यकीय सेवा देत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (घाटी) वेगवेगळ्या ११ विषयांतील पॅरामेडिकल अभ्यासक्रमांच्या १२५ विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता आहे. हे अत्याधुनिक पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलांमध्ये, तसेच विदेशामध्येही संधी मिळू शकते.
सिडको एन-६ भागात ‘एमजीएम’ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असून, या महाविद्यालयाची स्थापना १९९० मध्ये झाली. या महाविद्यालयात एमबीबीएस पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जात असून, पॅरामेडिकल कोर्सेसही याठिकाणी शिकविले जातात. याशिवाय काही खाजगी संस्थांमधून परिचारिका व पॅरामेडिकलचे पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात.
जिल्ह्यात एमबीबीएसव्यतिरिक्त बीएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमांपैकी यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालय, छत्रपती शाहू महाराज आयुर्वेदिक महाविद्यालय, तसेच वैजापूर तालुक्यात एक अशी तीन ‘बीएएमएस’ पदवी शिक्षण देणारी महाविद्यालये असून, होमिओपॅथीची भगवान होमिओपॅथी, फोस्टर होमिओपॅथी, डीकेएमएम होमिओपॅथी आणि सायली होमिओपॅथी महाविद्यालय, अशी चार महाविद्यालये आहेत.
चरितार्थाबरोबरच रुग्णसेवेची संधी देणाऱ्या क्षेत्रात डॉक्टर आणि परिचारकांव्यतिरिक्त करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून, युवकांना ‘पॅरामेडिकल’ क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य आहे. कोरोना संकट आणि त्यामुळे लावण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे अनेकांचा रोजगार धोक्यात आला आहे. याचे पडसाद यापुढेही काही काळ उमटत राहतील. या पार्श्वभूमीवर अल्प कालावधीचे आणि किमान शैक्षणिक अर्हता असणारे हे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम युवकांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.