कारवाईच्या आदेशाने पतंगाच्या दुकानातून नायलॉन मांजा गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:02 AM2021-01-03T04:02:16+5:302021-01-03T04:02:16+5:30
औरंगाबाद : साठवणूक, विक्रीवर बंदी असतानाही शहरात काही पतंग विक्रेते नायलॉन मांजा विकत होते. मात्र, गुरुवारी पतंगाच्या दुकानावर धाडी ...
औरंगाबाद : साठवणूक, विक्रीवर बंदी असतानाही शहरात काही पतंग विक्रेते नायलॉन मांजा विकत होते. मात्र, गुरुवारी पतंगाच्या दुकानावर धाडी टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने मांजा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ माजली. कारवाईच्या भीतीने विक्रेत्यांनी दुकानातून नायलॉन मांजा गायब करून टाकला.
नायलॉन मांजामुळे नाशिक येथे एका महिलेचा गळा चिरल्यामुळे तिचे निधन झाले. या बातमीची खंडपीठाने ३० डिसेंबर रोजी स्वतःहून दाखल घेऊन पतंगाच्या दुकानावर धाडी टाकून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले. यामुळे खडबडून जाग्या झालेल्या पोलीस यंत्रणेने गुरुवारी शहरातील काही पतंग विक्रेत्यांचा दुकानाची व गोदामाची कसून तपासणी केली.
आज शुक्रवारी नवीन वर्षाच्या पहिला दिवशी सदर प्रतिनिधीने राजाबाजार, नवाबपुरा, बुढीलेन, पैठणगेट परिसर, चंपाचौक परिसर, कैसर कॉलनी, बायजीपुरा, जुनाबाजार, बेगमपुरा या भागांतील काही दुकानांत मुलांना नायलॉन मांजा आणण्यासाठी पाठविले. मात्र, तिथे नायलॉन मांजा मिळत नाही, असे सांगण्यात आले. काही दुकानदारांनी न्यायालयाच्या आदेशाच्या बातमीचे कात्रण दुकानात लावल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे नवाबपुरा, कैसर कॉलनी या भागांत दोन दिवसाआधीपर्यंत नायलॉन मांजा सर्रासपणे विकला जात होता. कैसर कॉलनीतील अनेक मुले नायलॉन मांजा विकत आणून पतंग उडवत होते. यामुळे रस्त्यावरून जाणारे ३- ४ जण जखमी झाले होते. कोणाचा हात तर कोणाच्या पाय या मांजामुळे चिरला गेला. या जखमी लोकांवर खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. या लोकांनी पोलिसांत तक्रार दिली नसल्याने प्रकरणे उजेडात आली नाहीत, अशी माहिती कैसर कॉलनीतील मुजीब खान यांनी दिली. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा, असे निवेदन दोन दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी पोलीस विभागात दिले होते. न्यायालयाच्या आदेशाचे येथील नागरिकांनी स्वागत केले.
चौकट
७८ पक्षी जखमी
४४ पक्ष्यांचा मृत्यू
दोन महिन्यांत ४ व्यक्ती जखमी
मांजामुळे पक्षी जखमी
मागील वर्षी मांजामुळे जे पक्षी जखमी झाले. त्यातील जे जखमी पक्षी डॉक्टरकडे उपचारासाठी आणण्यात आले अशांची संख्या ७८ एवढी होती. त्यात कोकिळा, भारद्वाज, बगळे, गव्हाणी घुबड, कावळा, साळुंकी, पोपट, कपाशी घार, सारंग, या पक्ष्यांचा समावेश होता. कोणाची मान, कोणाचे पाय चिरले होते, तर काही जणांचे पंख छाटल्या गेले होते.
मृत्यूमध्ये लहान पक्ष्यांचा समावेश
डॉक्टरकडे उपचारासाठी आलेल्यांमधील ४४ पक्ष्यांचा मृत्यू झाला. यात मोठ्या पक्ष्यांचा समावेश होता; पण चिमणीसारखा लहान पक्षी मांजात पाय अडकून मृत्यू झाले त्यांची नोंदच नाही.
चौकट
झाडाला अडकलेला मांजा धोकादायक
संक्रांतीत शेकडो जण पतंग उडवत असतात. त्यावेळी मांजा पायात अडकून असंख्य पक्षी जखमी होतात; पण झाडाला जो मांजा अडकतो, तो वर्षभर त्या झाडावर लटकलेला असतो. त्यात पाय अडकून अनेक पक्षी जखमी होतात. त्याची गणती नाही.
-डॉ. किशोर पाठक (पक्षीमित्र)