व्यापाऱ्यांकडे सहा महिन्यांपूर्वीच नायलॉन मांजाचा साठा; पोलिसांना कळेपर्यंत झाली ५५ टक्के विक्री
By सुमित डोळे | Published: January 11, 2024 07:38 PM2024-01-11T19:38:46+5:302024-01-11T19:40:03+5:30
जिन्सी, राजाबाजार, नारेगावात विक्रेते म्हणतात ‘रात को चक्कर मार के देखो, मिला तो मिलेगा’; आता कोब्रा का गट्टू, टुनटुन, किंगफिशर या कोडचा वापर
- सुमित डोळे | मुनीर शेख
छत्रपती संभाजीनगर : नवाबपुऱ्यात दुपारी तीन वाजेची वेळ. पतंग, मांजाच्या दुकानांवरील गर्दीत दोन मुलांनी नायलॉन मांजासाठी विचारणा केली. विक्रेत्याने मुलांचा चेहरा न्याहाळून अनोळखी असल्याचे पाहून स्पष्टपणे नकार आला; परंतु, आग्रह केल्यानंतर बाहेर उभ्या एका व्यक्तीने मात्र ‘रात को चक्कर मार के देखो, मिला तो मिलेगा,’ असे उत्तर दिले. राजाबाजारच्या कोपऱ्यावरदेखील मुलांना असाच अनुभव आला. नारेगावातील एका किराणा दुकानातून दोन मुलांनी गल्लीत जात दोन पुड्यांत बांधलेला मांजा आणून दिला. एकेकाळी मांजा विक्रेत्या करणाऱ्या व्यावसायिकांच्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वीच व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा माल खरेदी करून ठेवला. त्यातील जवळपास ५५ टक्के माल विकलादेखील गेल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांना जाग मात्र नागरिक जखमी व्हायला लागल्यानंतर आली.
नायलॉन म्हणजेच चायनीज मांजामुळे शहरात गेल्या आठवड्याभरात आठ नागरिक जखमी झाले. डिसेंबर अखेर पुण्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्यानंतर पोलिसांना कारवाईची आठवण झाली. राज्यभरात अहमदनगर, पुणे, नाशिक, धुळे जिल्ह्यांत लहान मुले गंभीर जखमी झाले. याची गंभीर दखल घेत खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी मंगळवारी पोलिस, मनपा प्रशासनाची कानउघाडणी केली. त्यानंतर बुधवारी विक्रेते भूमिगत झाले. लोकमत प्रतिनिधींनी बुधवारी एक ते तीन या वेळेत नारेगाव, जिन्सी, सिटी चौक परिसरात मांजा खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ठिकाणी चेहरा पाहून स्पष्टपणे नकार दिला. नारेगावात एका सूत्राने दोन मुलांच्या मध्यस्थीने किराणा दुकानातून मांजा आणून दिल्याची धक्कादायक बाब हाती लागली.
१५० रुपयांची गड्डी ३५० रुपयांवर
- कारवाई वाढल्याने दिवसा मांजा देणे विक्रेत्यांनी बंद केले आहे. रात्री ११:३० वाजल्यानंतर ते चौकात बोलावतात. मागणीनुसार काॅल करतात. कॉलवरील व्यक्ती काही वेळात मांजा आणून देते.
- बुधवारी नायलॉन मांजाचा भाव अचानक वधारला. डिसेंबरअखेर १५० रुपयांत मिळणारी गड्डी बुधवारी अचानक ५०० रुपयांपर्यंत गेली.
सांकेतिक भाषा; कोब्रा की गड्डी?
मांजा विक्रेत्यांमध्ये नायलॉन, चायनीज मांजासाठी कोडिंगचा वापर केला जात आहे. हिरो प्लस, मोनाे काईट, किंगफिशर, मोनोगोल्ड, मोनोफायटर, कोब्रा, टुणटुण या कोडिंगने शहरात मांजा विक्री होत आहे.
या भागातून शहराला पुरवठा
जिन्सी, सिटी चौक, वाळूज परिसरात नायलाॅन मांजाचे व्यापाऱ्यांचे बस्तान आहे. अनेक जुन्या विक्रेत्यांचा बारा महिने होलसेल पतंग विक्रीचे व्यवसाय आहे. वर्षभर त्यांच्याकडे यंत्रणा लक्ष देत नाही. जानेवारीत कारवाईची चर्चा सुरू होण्याची कल्पना असल्याने ५ ते ६ महिन्यांपूर्वीच ठाणे, मुंबई, उत्तर प्रदेश, गुजरातहून लाखोंचा मांजा आणला जातो.
१२००च्या दंडाला घाबरणार कोण?
कलम १८८ भादंवि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कलम-५ नुसार यात गुन्हा दाखल होतो. यात नोटीस देऊन आरोपीला सोडले जाते. त्यात १२०० रुपयांची शिक्षा आहे. परिणामी, विक्रेत्यांना भीती राहिली नाही. नागपूर खंडपीठाने या कायद्यात बदल करण्यासंदर्भात विचारणा केली होती, ते होणे अत्यंत गरजेचे आहे.
-ॲड. सत्यजित बोरा, विधिज्ञ.