अरे देवा..., नकली चांदी अर्पण करून भाविक फेडतात नवस

By प्रशांत तेलवाडकर | Published: December 30, 2022 03:22 PM2022-12-30T15:22:23+5:302022-12-30T15:23:10+5:30

चांदीसारखे चकाकणारे ‘व्हाइट मेटल’ मिळते स्वस्तात

O God..., devotees pay their vows by offering fake silver | अरे देवा..., नकली चांदी अर्पण करून भाविक फेडतात नवस

अरे देवा..., नकली चांदी अर्पण करून भाविक फेडतात नवस

googlenewsNext

औरंगाबाद : संस्थान गणपती मंदिरात नवसापोटी भाविकांनी लहान-मोठ्या वस्तू अर्पण केल्या होत्या. सुमारे एक किलो चांदी जमा झाली होती. विश्वस्तांनी गणरायाला दागिने करण्यासाठी चांदी सुवर्णकाराकडे नेली असता त्यातील १५० ते २०० ग्रॅम चांदी खरी निघाली. बाकीचे ‘व्हाइट मेटल’ होते. हे केवळ एक उदाहरण आहे. शहरातील अनेक मंदिरांत नकली चांदीच्या वस्तू कमी-अधिक प्रमाणात जमा झाल्या आहेत. म्हणजे नवस फेडण्यासाठी देवाचीही फसवणूक केली जात आहे, असेच उद्गार मंदिर विश्वस्तांच्या तोंडून निघाले.

चांदी नव्हे, व्हाइट मेटल
संस्थान गणपती मंदिर ट्रस्टचे प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या काळात मंदिरात एक किलोदरम्यान चांदीच्या वस्तू जमा झाल्या होत्या. भाविकांनी लहान-मोठ्या दुर्वा, मोदक अर्पण केले. त्या ज्वेलर्सकडे नेल्या असता त्यातील १५० ते २०० ग्रॅमच शुद्ध चांदी निघाली. बाकीचे व्हाइट मेटल होते. अशा सर्व वस्तूंची नोंद धर्मादाय सहआयुक्तालयात करावी लागते. त्यासाठी ज्वेलर्सकडून प्रमाणपत्र घेतले.

झिरो टन चांदी म्हणजे काय ?
व्हाइट मेटलला सराफा भाषेत ‘ झिरो टन चांदी’ असे म्हणतात. आजघडीला शुद्ध चांदीची किंमत ५४,३०० रुपये किलो आहे. मात्र, व्हाइट मेटल अवघ्या २ हजार रुपये किलोने मिळते.

कशी ओळखली जाते असली चांदी?
ज्वेलर्सकडे चांदी पारखण्याची एक पद्धत आहे. काळ्या रंगाचा छोटा गुळगुळीत दगड त्यांच्याकडे असतो. त्यास कसोटी म्हणतात. या दगडावर चांदीची वस्तू घासली जाते. त्यावर एक थेंब ॲसिड टाकले जाते. एक थेंब मिठाचे पाणी टाकले जाते. चांदीचा रंग त्या थेंबात तरंगतो. त्यावरून ती चांदी किती टक्के शुद्ध आहे हे कळते. आता लेझर मशीन आल्या आहेत. त्यावर काही सेकंदात चांदीची किती शुद्धता व किती अन्य धातू, याचे अचूक वर्गीकरण होते.

वस्तू अर्पण करताना खात्री करा
वरद गणेश मंदिरात वर्षातून एकदा तिजोरी उघडली जाते. ‘नकली’ दानाचा काहीच फायदा मंदिराला होत नाही. कोणी वस्तू स्वरूपात दान करतात, त्यांचे बिल पाहिले जाते. शुद्ध चांदी असेल तर, त्या वस्तूची किंमत काढून मंदिराची पावती दिली जाते.
- मनोज पाडळकर, माजी अध्यक्ष, गणेश सभा विश्वस्त मंडळ

विश्वासू ज्वेलर्सकडूनच दानाच्या वस्तू खरेदी करा
काही ग्राहक स्वस्तात मिळते म्हणून चांदीऐवजी व्हाइट मेटल खरेदी करतात. यासाठी विश्वासू ज्वेलर्सकडून वस्तू खरेदी करा व त्याचे बिल घ्या.
- प्रमोद नरवडे, विश्वस्त, पावन गणेश मंदिर, माजी अध्यक्ष, गणेश सभा विश्वस्त मंडळ

Web Title: O God..., devotees pay their vows by offering fake silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.