समता परिषदेतर्फे उद्या ओबीसीचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:11+5:302020-12-17T04:33:11+5:30
या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि बापूसाहेब भुजबळ हे करणार आहेत. औरंगपुरा येथून निघून ...
या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि बापूसाहेब भुजबळ हे करणार आहेत.
औरंगपुरा येथून निघून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल. मोर्चात सुमारे दहा हजार कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.
पुण्यातील मोर्चात पिवळ्या झेंड्यावर शरद पवार यांचे फोटो झळकले होते, याकडे लक्ष वेधले असता भुजबळ यांनी स्पष्ट केले की, औरंगाबादच्या मोर्चात असे घडणार नाही. हा मोर्चा राजकीय असून, यात विविध पक्ष ओबीसींच्या संघटना आपापले बॅनर घेऊन सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात शरद पवार यांनी मंडल आयोग लागू करण्याचा दिवस लक्षात घेऊन पुण्याच्या मोर्चात शरद पवार यांचे फोटो झळकले होते, ही बाब बापूसाहेब भुजबळ यांनी मान्य केली.
मराठा समाज प्रस्थापित असून, राज्यातील सर्व सहकारी, शैक्षणिक इतर संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या समाजाने ओबीसींना आधीच जे कमी मिळत आहे, त्यात वाटेकरी होऊ नये, अशी आमची भावना आहे.
मराठा ओबीसी समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला शासनाने आळा घालावा व मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची न्याय्य बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची मोठी फौज उभी करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेस समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, माजी अध्यक्ष जयराम साळुंखे, निशांत पवार, गजानन सोनवणे, नवनाथ वाघमारे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.