"...हे त्यांच्याच गळ्यात गुंतणार"; ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, मनोज जरांगे यांचा थेट आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 01:44 PM2024-06-19T13:44:13+5:302024-06-19T13:47:04+5:30
"पूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनात फार फरक आहे. राजकीय नेत्यांची चळवळ लगेच लक्षात येते. नियोजनबद्ध पद्धतीने येणे, राजकीय नेते कसे टप्प्याटप्याने निघाले. हे लगेच लक्षात येते. ठरवून असलेले लगेच लक्षात येते."
आम्हाला सरकारने १७-१७ दिवस उपोषणाला बसवले. कोणते लाड केले? माझा त्यांना (ओबीसी) विरोध नाही. त्यांनी आंदोलन करावे. मी आंदोलन करणाऱ्यांना दोषच देत नाही. त्यांना तो अधिकार आहे. हे सरकार घडवून आणतंय. असा आरोप करत, मी सरकारला म्हणतोय, त्यांना (ओबीसी) म्हणतच नाही. एक दिवस त्यांचेही आंदोलन संपणार आहे. आमचेही संपणार आहे. सरकार डाव खेळत आहे. पण सरकारच्या एक लक्षात येत नाही. हे त्यांच्याच गळ्यात गुंतणार आहे. तेच अडचणीत येणार," असे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते.
उपोषणामुळे प्रकृती खालवल्याने जरांगे छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "पूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनात फार फरक आहे. राजकीय नेत्यांची चळवळ लगेच लक्षात येते. नियोजनबद्ध पद्धतीने येणे, राजकीय नेते कसे टप्प्याटप्याने निघाले. हे लगेच लक्षात येते. ठरवून असलेले लगेच लक्षात येते. तू बस मी येतोच दुसऱ्या दिवशी... तेथे बसलेल्या (उपोषणाला) बांधवांना (ओबीसी बांधव) दोष देऊन काही उपयोग नाही. हे सर्व सरकार घडवून आणत आहे."
बांधवांनो आत्महत्या करू नका... -
मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना, विद्यार्थ्यांना आणि तरुणांना माझी हात जोडून विनंती आहे की, आपल्याला कधी आरक्षण मिळणारच नव्हते. ते आता मिळू लागले आहे. यामुळे आरक्षण मिळत नाही म्हणून कुणी आत्महत्या करू नका. मी आरक्षण दिल्याशिवाय हटनार नाही."
मात्र, त्या आरक्षणात कुणाचा नंबर लागला नाही, तरी निराश होऊ आत्महत्या करू नका. आरक्षण नसल्याने कुणी नोकरीपासून वंचित राहिला तरी आत्महत्या करू नका. पुन्हा प्रचत्न करा. तुम्हाला काही दिवसांनी आरक्षण मिळेल. त्यानंतर पुन्हा काही प्रयत्न करा, कारण तुमचे भविष्य आत्महत्या केल्याने घडणार नाही.
मी आरक्षण मिळवून देणारच -
तुम्ही कुणीही आत्महत्या करू नका. आज एखाद्या टक्क्याने हुकले असाल तर हुकू द्या. मी आरक्षण मिळवूनच देणार. मी आरक्षण घेतल्याशिवाय हाटत नाही. मला एकही मराठी समाजाचा माणूस कमी होऊ द्यायचा नाही.