कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 07:32 AM2024-09-25T07:32:37+5:302024-09-25T07:32:48+5:30
ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे प्रा. लक्ष्मण हाके यांचा इशारा
बापू साळुंके/राम शिनगारे
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असताना, त्याच गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर ओबीसी आरक्षण बचावचे प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही उपोषण सुरू केले. या उपोषणामागील भूमिका व पुढील दिशा समजून घेण्यासाठी प्रा. हाके यांच्यासोबत 'लोकमत'ने साधलेला हा संवाद.
प्रश्न : तुमचे आंदोलन कशासाठी आहे?
उत्तर : मराठा समाज ओबीसीत आल्यास त्यांच्या स्पर्धेत दुबळा बलुतेदार कसा टिकेल? आरक्षण हा गरिबी हटाव
कार्यक्रम नाही. आमचे आरक्षण वाचविण्यासाठी आमचे आंदोलन आहे.
प्रश्न : अंतरवाली सराटीच्या मुख्य रस्त्यावरच उपोषण का?
उत्तर : वडीगोद्रीत आंदोलनाला बंदी आहे का? आम्हाला आचार, विचार स्वातंत्र्य नाही का? मग त्यांचे आंदोलन अंतरवालीतच का असते?
प्रश्न : तुमच्या उपोषणामुळे तणाव निर्माण होतोय, असे वाटत नाही? उत्तर: कायदा, सुव्यवस्था पाळण्याचा ठेका फक्त ओबीसींनी घेतला काय? त्यांनी शिव्या द्यायच्या, घरे जाळायची. आमचे उपोषण लोकशाहीनुसार नसते, तर पोलिसांनी बसू दिले असते का?
प्रश्न: पण सामाजिक तणाव वाढणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायला नको?
उत्तर : आम्हीच सामाजिक जाणीव पाळायची का? हे आंदोलन अॅक्शनची रिअॅक्शन आहे. हा काऊंटर अटॅक आहे. जिथे आंदोलनाचे मूळ आहे, तिथेच रोखायचे आहे.
प्रश्न: ही आंदोलने दिवसेंदिवस शिवराळ होत चालली नाहीत का?
उत्तर : कोण शिव्या देतंय? त्यांनी शिव्या दिलेल्या तुम्ही दाखवतात आणि आम्ही मिस्टर संभाजी म्हटले, तर आग होतेय. तो माणूस संस्कृती, सभ्यतेचे सर्व निकष गुंडाळून ठेवतो त्याचे काही नाही.
प्रश्न : तुम्ही महायुतीच्या बाजूने लढता, हे खरे आहे का?
उत्तर : कधी भुजबळ, वडेट्टीवार, तर कधी शरद पवार यांचे पिट्ठ म्हणता. देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असल्याचे सांगता. कोणा एकाचे तरी नाव घ्या!
प्रश्न : या आंदोलनाचा शेवट कसा होणार?
उत्तर : आमचा जीव गेला तरी ओबीसींचे हक्काचे आरक्षण आम्ही टिकवणारच. कोणी अंगावर आला, तर त्याला शिंगावर घेणारच. त्यामुळे कोणतेही गॅझेट, कुणबी प्रमाणपत्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही.