सरकार ‘जवाब दो’ आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:56 AM2017-09-11T00:56:08+5:302017-09-11T00:56:08+5:30
ओबीसी-भटक्या विमुक्तांनी ‘जवाब दो’ आंदोलनाचा इशारा दिला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : या देशातील ५२ टक्क्यांहून अधिक असलेल्या ओबीसींच्या प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, यासंबंधीचा जाब विचारण्यासाठी आता ओबीसी-भटक्या विमुक्तांनी ‘जवाब दो’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रविवारी दुपारी राधाकृष्ण मंगल कार्यालयात शहरातील ओबीसी व भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी मनोज घोडके हे होते.
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपद न्या. म्हसे यांच्या निधनामुळे रिक्त झाले आहे. ओबीसींसाठी असलेल्या या आयोगाच्या अध्यक्षपदावर आता तरी शासनाने ओबीसी तज्ज्ञाची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली. तसेच एससी, एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांनाही केवळ ६५० नव्हे तर १३०० अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जावी, यावर भर देण्यात आला. ओबीसींसाठी असलेले ओबीसी आर्थिक विकास महामंडळ केवळ कागदावर आहे. या महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, या मागणीसाठी लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे आंदोलन करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत करण्यात आला. समता परिषदेचे रमाकांत तिडके, विलास ढंगारे, महाराष्टÑ राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समितीच्या अध्यक्षा सरस्वती हरकळ, उपाध्यक्षा संजीवनी घोडके, अॅड. महादेव आंधळे, कै काडी समाजाचे नेते संजय मेढे, भटक्या- विमुक्तांचे नेते अमिनभाई जामगावकर, पंडितराव तुपे, विष्णू वखरे, सुतार समाजाचे सुरेश आगलावे, अनिता देवतकर, रमेश गायकवाड, दीपक राऊत, नितीन तोगे, गोविंद पांचाळ, सय्यद हबीब, सोमनाथ चोपडे, बिपीन होले, दत्तात्रय आरसुळे, संजय माळी आदींनी आपापली मते मांडली.
ओबीसींच्या आंदोलनात विद्यार्थी व युवकांचा सहभाग वाढविण्याचे व एससी, एसटी, भटक्या- विमुक्तांचाही सहभाग घेण्याचे आज ठरविण्यात आले. बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या निर्घृण हत्येचा व पुण्यासारख्या शहरात सोवळ्यावरून जातीय दरी रुंदावण्याच्या ज्या हीन मानिसकतेचे दर्शन घडविण्यात आले, त्याचा बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. गौरी लंकेश यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संदीप घोडके यांनी आभार मानले.