१000 घरकुलांचेच आले उद्दिष्ट
By Admin | Published: July 17, 2017 11:25 PM2017-07-17T23:25:48+5:302017-07-17T23:30:47+5:30
हिंगोली : गेल्या वर्षीचे ३ हजार घरकुलांचे उद्दिष्ट अजूनही पूर्ण झाले नाही. कधी आॅनलाईनची अडचण तर काही लाभार्थ्यांना पुढील हप्तेच मिळाले नसल्याने कामे ठप्प आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गेल्या वर्षीचे ३ हजार घरकुलांचे उद्दिष्ट अजूनही पूर्ण झाले नाही. कधी आॅनलाईनची अडचण तर काही लाभार्थ्यांना पुढील हप्तेच मिळाले नसल्याने कामे ठप्प आहेत. भर पावसाळ्यात लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ येत आहे.
हिंगोली जिल्ह्याला गतवर्षी तीन हजार घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले असले तरीही आता ही सर्व प्रक्रिया आॅनलाइन झाल्याने तीच त्रासदायक ठरत आहे. पारदर्शकतेसाठी आणलेली ही प्रक्रिया लाभार्थ्यांना मात्र काहीच कळत नसल्याने अडचण झाली आहे. फोटो अपलोडच केले जात नसल्याने दुसऱ्या हप्त्याचे काम करूनही लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळाला नसल्याची उदाहरणे आहेत. तर अभियंतेही या नव्या झंझटीमुळे या कामांकडे कानाडोळा करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच जुनी कामगिरी ठीकठाक नसल्याने यंदा केवळ हजार घरकुलांचेच उद्दिष्ट आले आहे. जिल्ह्यात जवळपास साडेसात हजार लाभार्थी सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार आधीच जाहीर झाले आहेत. त्यानंतर पुन्हा ग्रामसभा घेऊन यात बेघर व पात्र लाभार्थी देण्यास सांगितले होते. त्यात जवळपास २५ हजार जणांची नावे देण्यात आलेली आहेत. या लोकांचे नेमके काय होणार आहे, याचे अजून कोणीच काही सांगत नाही. त्यामुळे त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. त्यातच उद्दिष्टही कमी येत असल्याने २0२१ पर्यंत सर्व बेघरांना घरे देण्याचे स्वप्न कसे पूर्ण होणार, हा प्रश्नच आहे.