औरंगाबाद खंडपीठ स्थापनेचा उद्देश सफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:27 AM2018-08-27T00:27:35+5:302018-08-27T00:28:45+5:30
केवळ दोन न्यायमूर्ती, निवडक वकील आणि काही हजार प्रकरणांसह सुरू झालेल्या या खंडपीठात आज सोळा न्यायमूर्ती, साडेतीन हजार वकील आणि वर्षाला सुमारे ३५ हजारांपेक्षा जास्त प्रकरणे दाखल होत असल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेचा उद्देश सफल झाला, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश एच. पाटील यांनी रविवारी औरंगाबादेत व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केवळ दोन न्यायमूर्ती, निवडक वकील आणि काही हजार प्रकरणांसह सुरू झालेल्या या खंडपीठात आज सोळा न्यायमूर्ती, साडेतीन हजार वकील आणि वर्षाला सुमारे ३५ हजारांपेक्षा जास्त प्रकरणे दाखल होत असल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेचा उद्देश सफल झाला, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश एच. पाटील यांनी रविवारी औरंगाबादेत व्यक्त केले.
जनहित याचिकांची वाढलेली प्रचंड संख्या पाहता, समाजातील अनेक प्रश्नांची सोडवणूक न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून होऊ शकेल हा सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ करताना घटनेने आपल्याला दिलेले अधिकार आणि जबाबदाºयांचे सर्वांनी कसोशीने पालन करावे, असे आवाहन न्या. पाटील यांनी केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य न्या. पाटील बोलत होते. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्तीद्वय बी. एन. देशमुख आणि न्या. पी. व्ही. हरदास उपस्थित होते. व्यासपीठावर खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अतुल कराड, उपाध्यक्षद्वय अॅड. राम शिंदे व अॅड. मंजूषा जगताप आणि सचिव कमलाकर सूर्यवंशी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.
एखाद्या संस्थेच्या आयुष्याची ३७ वर्षे म्हणजे फार मोठा कालावधी नाही; परंतु औरंगाबाद खंडपीठामध्ये या कालावधीत अनेक मान्यवरांनी वाखाणण्याजोगे कार्य करून अनेक नवीन पायंडे पाडले. नवनवीन, उज्ज्वल परंपरा निर्माण केल्या. त्या उज्ज्वल परंपरेचे पाईक होण्याकरिता खंडपीठातील तरुण वकिलांनी त्यांचे पालन आणि अनुकरण करायला हवे. त्यातूनच आणखी नवीन, उज्ज्वल परंपरा निर्माण होतील, असे न्या. पाटील म्हणाले.
‘चांगले चारित्र्य आणि उच्च मूल्ये हेच यशाचे गमक आहे, तरुण वकिलांनी ज्ञानाच्या बरोबरीने मूल्यांची आणि प्रामाणिकपणाची जपणूक करीत काम करण्याचे आवाहन न्या. बी. एन. देशमुख यांनी केले.
खंडपीठाची होत असलेली प्रगती नेत्रदीपक असल्याचे न्या. पी. व्ही. हरदास यांनी म्हटले. न्यायमूर्ती आणि वकिलांमध्ये असलेल्या सौहार्दतेमुळे किती चांगली कामे होऊ शकतात हे आपण प्रत्यक्ष अनुभवल्याचे त्यांनी म्हटले. खूप मोठी परंपरा आणि नावलौकिक असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. नरेश पाटील यांची झालेली निवड आपल्या
सर्वांकरिता अभिमानास्पद आणि प्रेरणा देणारी आहे, असे न्या. हरदास म्हणाले.
तेराव्या खेळाडूची धुवाधार बॅटिंग
अचानकपणे बॅटिंगला पाठविलेला पॅव्हेलियनमधील तेरावा खेळाडू म्हणून मैदानात (मंचावर) आलेले न्या. प्रसन्ना वराळे यांनी मराठीमधून केलेल्या खुमासदार वक्तव्याने चांगलीच रंगत निर्माण केली. मुख्य न्या. पाटील यांच्यापुढे आणि त्यांच्यासोबत काम करतानाचे अनेक अनुभव त्यांनी कथन केले. खंडपीठाचा वर्धापन दिन म्हणजे आपल्या सर्वांसाठीच सिंहावलोकनाचा आणि सर्वांनी एकत्र येऊन विचारमंथन करण्याचा दिवस आहे. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याकरिता आपण काय करू शकतो, संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या प्रगतीच्या दृष्टीने आपली वाटचाल कशी असावी यावर विचारमंथन करण्याचा हा दिवस आहे, असे ते म्हणाले.
वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अतुल कराड यांनी प्रास्ताविकात खंडपीठाच्या नवीन इमारतीचे आणि वकिलांच्या कक्षाचे काम व इतर मागण्या मांडल्या आणि स्वागत केले. अॅड. रश्मी गौर-सबनीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर वकील संघाचे सचिव कमलाकर सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला औरंगाबाद खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती, ज्येष्ठ
वकील, सनदी अधिकारी आणि वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
न्या. पाटील भावी पिढीचे आदर्श
४औरंगाबाद खंडपीठात वकिली व्यवसाय केलेले मराठवाड्याचे सुपुत्र त्याच ठिकाणी न्यायमूर्ती आणि नंतर जगभर नावलौकिक असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती बनलेले न्या. नरेश पाटील हे भावी पिढीचे आदर्श असल्याच्या भावना वक्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
राज्यपाल आणि मुख्य न्या. ताहिलरमाणी यांचे संदेश
४राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन प्रभारी मुख्य न्यायमूर्ती आणि सध्या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती असलेल्या न्या. विजया कापसे-ताहिलरमाणी यांचे खंडपीठाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्तच्या संदेशांचे अॅड. राम शिंदे आणि अॅड. संगीता धुमाळ-तांबट यांनी वाचन केले.