खंडोबा यात्रेचे वेध; गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी घरूनच दर्शन घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 07:44 PM2020-12-11T19:44:09+5:302020-12-11T19:44:34+5:30
मंदिर परिसरातील पूजापाठ हा ट्रस्टी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्याचे नियोजन आहे.
औरंगाबाद: खंडोबा यात्रा उत्सवाला २० डिसेंबरला सुरुवात होणार आहे. सार्वजनिक यात्रेस प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी घरातूनच ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन खंडोबा मंदिरांच्या विश्वस्तांनी केले आहे.
मंदिरात भाविकांना सुरक्षित अंतर राखूनच प्रवेश दिला जाणार आहे. सध्याही मंदिर प्रवेशापूर्वी शरीराचे तापमान घेतले जाते. त्यानंतरच प्रवेश दिला जातो. त्याशिवाय मास्क, सॅनिटायझरचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. मंदिर विश्वस्तांनी पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना अर्ज देऊन परवानगी मागितली होती, परंतु उत्सवातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असल्याने यात्रा भरविण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. असे असले तरी सर्व नियमांचे पालन केले जाईल, असे विश्वस्तांनी नमूद केले आहे. सामाजिक संस्थेने श्रमदानातून बुधवारी मंदिर परिसर स्वच्छ केला. तसेच मास्क व सॅनिटायझर विषयी जनजागृतीही केली.
ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्या
मंदिर परिसरातील पूजापाठ हा ट्रस्टी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्याचे नियोजन आहे. ऑनलाईन मंदिर दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष साहेबराव पळसकर यांनी केले आहे.