चौपदरीकरणात अडथळ्यांचे डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:39 AM2017-09-25T00:39:34+5:302017-09-25T00:39:34+5:30
औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव ते तीसगावपासून पुढे अहमदनगर या एनएच क्रमांक २२२ ला जोडणाºया मार्गाच्या रुंदीकरणात मनपाची जलवाहिनी, नागरी वसाहतींमुळे अडचण येत असल्याचे डीपीआरमध्ये समोर आले आहे.
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव ते तीसगावपासून पुढे अहमदनगर या एनएच क्रमांक २२२ ला जोडणाºया मार्गाच्या रुंदीकरणात मनपाची जलवाहिनी, नागरी वसाहतींमुळे अडचण येत असल्याचे डीपीआरमध्ये समोर आले आहे. बिडकीन परिसरात १९ कि़ मी. च्या अंतरात अडथळ्यांवर मात करून या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी २५० कोटींचा अतिरिक्त निधी लागण्याची शक्यता आहे.
केंद्रीय दळणवळण खात्याच्या भारतमाला योजनेंतर्गत औरंगाबाद ते पैठण या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रास्ट्रक्चर कनक्लेव्ह’ या कार्यक्रमात त्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे डीपीआरचे काम सुरू असून, भूसंपादन, मार्ग रुंदीकरणात येणारी जलवाहिनी, निवासी घरकुलांची माहिती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्या मार्गासाठी डीपीआर तयार केला होता. परंतु नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे या मार्गाच्या कामाची जबाबदारी देण्यात आल्याने तो डीपीआर रद्द करून नव्याने डीपीआरचे काम सुरू झाले आहे.
एनएचआयएच्या सूत्रांनी सांगितले की, डीपीआरचे काम सुरू झाले आहे. काही ठिकाणी जमिनीचे वाद आहेत. बिडकीनपर्यंत रुंदीकरणात अडचणी आहेत. बायपास करण्यासाठी कुठेही जागा नाही. घरांची तोडफोड करावी लागेल. १९ कि़ मी. पर्यंत ही परिस्थिती आहे. मनपाची जलवाहिनीदेखील त्याच मार्गात आहे. जलवाहिनी काढून स्थलांतरित करण्याचा खर्च २५० कोटींच्या आसपास जाईल. उड्डाणपूल करण्याचा पर्याय आहे. परंतु त्याचा खर्च वाढेल. बिडकीनपासून पुढे अडचण नाही. शेवगाव ते तीसगावपर्यंत मार्ग होईल. एनएन-२२२ ला हा मार्ग जोडण्याचा प्रयत्न आहे.
वाहतूक मोठ्या प्रमाणात डायव्हर्ट होईल. औरंगाबाद ते पैठण ६० कि़मी., पैठण ते शेवगाव ३० कि़ मी., २० कि़ मी. तीसगावपर्यंत व तेथून पुढे ३० कि़ मी. अहमदनगरपर्यंत या मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव आहे. १४० कि़ मी. पर्यंत या मार्गासाठी १ हजार कोटींच्या आसपास खर्च लागण्याची शक्यता आहे.