मुख्य परीक्षेला पात्र ठरलेल्या ४००० उमेदवारांना ‘त्या’ नियमाचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:02 AM2021-09-18T04:02:02+5:302021-09-18T04:02:02+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परिवहन खात्यामधील सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मार्चमध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. तिचा ...
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परिवहन खात्यामधील सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मार्चमध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. तिचा निकाल दीड वषार्नंतर लागला होता. त्यानंतर ३० ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या राज्यातील सुमारे ४००० उमेदवारांपुढे ‘वाहन चालविण्याचा कायमस्वरूपी परवाना’ आवश्यक असल्याच्या नियमाचा अडसर निर्माण झाला आहे.
यासंदर्भात दाखल याचिकेची सुनावणी २० सप्टेंबर रोजी (सोमवारी) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात होणार आहे. याचिकेच्या निकालावर याचिकाकर्ते मुख्य परीक्षेचा अर्ज (फॉर्म) दाखल करण्यास पात्र ठरतात काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे कायम परवान्यास विलंब
पूर्व परीक्षेनंतर कोरोनामुळे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारी केंद्रे दीर्घकाळ बंद होती. काही प्रशिक्षण केंद्र अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांना वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. परिणामी, त्यांना कायमस्वरूपी वाहन परवाना प्राप्त करता आला नाही. वरील पदासाठी मुख्य परीक्षेकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया ६ सप्टेंबरपासून सुरु असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर आहे.
आयोगाने काढला अध्यादेश
दरम्यान, मुख्य परीक्षेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांकडे गियर असलेली दुचाकी, हलके वाहन आणि जड वाहन चालविण्याचा कायम परवाना २० सप्टेंबर २०२१ रोजी असणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. यापैकी जड वाहन चालविण्याचा कायम परवाना नसल्यास दोन वर्षांच्या परिवीक्षा काळामध्ये सादर करण्याची सूट दिली आहे.
उमेदवारांची खंडपीठात धाव
शिल्पा चाटे व इतर उमेदवारांनी ॲड. अभिजित दरंदळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. कायम परवान्याची अट रद्द किंवा शिथिल करावी. जड वाहनासाठी दिलेली दोन वर्षांची सूट इतर दोन परवान्यांनाही द्यावी. उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारून, त्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याची विनंती याचिकेत केली आहे.