औरंगाबाद जिल्ह्यात भरड धान्य खरेदीत बारदान्याचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 07:36 PM2020-06-16T19:36:42+5:302020-06-16T19:38:17+5:30
चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ज्यूट मिल्स बंद असल्याने निर्माण झाला पेच
- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : मुदत संपायला आली तरी भरडधान्य खरेदीचा मार्ग सुकर होताना दिसत नाही. ३० जून ही भरडधान्य खरेदीची शासनाने दिलेली शेवटची तारीख आहे. बारदाना नसल्याने भरडधान्य खरेदीत अडचण निर्माण झाली आहे. एक तर ही केंद्रेच उशिरा सुरू झाली आणि झाली तरी ती बारदाना नाही म्हणून बंद अवस्थेतच राहिली. याचे जवळचे उदाहरण म्हणजे करमाडचे खरेदी केंद्र.
पश्चिम बंगालला नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाचा फटकाही भरडधान्य खरेदीला बसला. भरडधान्य खरेदीकरिता राज्य सरकारने केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्यूट आयुक्त, मुंबईमार्फत नवीन बारदान्याची मागणी केली होती; परंतु बारदान्याचा पुरवठा होऊ शकला नाही. एक तर लाकडाऊन आणि त्यात पश्चिम बंगालला बसलेला चक्रीवादळाचा तडाखा. चक्रीवादळामुळे बंगालमधील ज्यूट मिल्स बंद आहेत. त्यामुळे तिकडून बारदाना मागवूनही मिळाला नाही आणि नजीकच्या काळातही मिळण्याची शक्यता नाही. मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या ई निविदेसही योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेही बारदाना उपलब्ध होऊ शकला नाही. मार्केटिंग फेडरेशनने दिलेल्या प्रस्तावानुसार शासनाने आता शेतकऱ्यांकडील बारदान्यामध्ये मका व ज्वारी खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना बारदान्याची किंमत अदा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्शर्भूमीवर शासनाने प्रथमच रबी हंगामाकरिता भरड धान्य खरेदीचा निर्णय घेतला होता. मुदत संपायच्या आत ही खरेदी होते का, शासनाने परवानगी दिली तरी शेतकरी बारदान्याच्या बाबतीत कसा प्रतिसाद देतात, हे आता पाहावयाचे.
कापूस खरेदीचेही त्रांगडेच
राज्यभरातील कापूस उत्पादकांचा कापूस शासन कधी खरेदी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन कापसाला साडेपाच हजार रुपये इतका हमीभाव देत आहे. खुल्या बाजारात इतका भाव नाही. त्यामुळे यात व्यापारी हात धुऊन घेण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी पथके नियुक्त केली. थेट कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेटून त्यांचा किती कापूस शिल्लक आहे, याचा अहवाल मागवला होता. हे काम युद्धपातळीवर व्हायला हवे होते; परंतु तीन तालुके वगळता अन्य तालुक्यांतील कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. एक तर लाकडाऊनमुळे कापूस खरेदीला विलंब झाला. त्यामुळे हा कापूस खरेदीविना शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यातच हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेले आहे. दरम्यान, यंदा पावसानेही उत्तम सुरुवात केली असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र, कापूस खरेदी रखडली असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.