प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णसेवेत अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:04 AM2021-04-23T04:04:06+5:302021-04-23T04:04:06+5:30
पैठण : कोरोनाची दुसरी लाट सुरू होताच पैठण तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यातील १९१ ...
पैठण : कोरोनाची दुसरी लाट सुरू होताच पैठण तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यातील १९१ महसुली गावांपैकी १०६ गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी तब्बल १६ गावांमध्ये कन्टोनमेंट झोन घोषित करून उपाययोजना केल्या जात आहेत. तरीदेखील आरोग्य यंत्रणा रुग्णसेवा देण्यात अपयशी ठरत आहे.
दुसरीकडे ग्रामीण भागात उपाययोजना करण्यात प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरली असून त्याला ढिसाळ नियोजन कारणीभूत ठरत आहे. तर कुठलेही बंधने न पाळता नागरिकांचा मुक्तसंचार सुरू असल्याने कोरोना रुग्णांची व बाधित गावांची संख्या वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील ४३८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३,७१८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी ३,२२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
या ठिकाणी आहेत कोविड सेंटर
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तालुक्यात पाच कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. यात समाज कल्याण मुलीचे वसतिगृह, डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह, पाचोड ग्रामीण रुग्णालय, चितेगाव, व मराठवाडा प्रबोधिनी जायकवाडी अशा पाच कोविड सेंटरचा समावेश आहे. तर शहरातील खासगी माऊली हॉस्पिटलला कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली गेली आहे. या सर्व ठिकाणी मिळून २४५ बेड आहेत. १५० बेडवर उपचार सुरू असून माऊली हॉस्पिटलमध्ये १६ रुग्ण व १९९ रुग्णांनर औरंगाबाद व अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. तसेच बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे कोविड सेंटर प्रस्तावित आहे. सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. गरजेप्रमाणे येथील कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.
ऑक्सिजन बेड नगण्य
तालुक्यात पाचोड येथील ट्रामा सेंटरमध्ये १५ ऑक्सिजन बेड कोरोना रुग्णासाठी राखीव आहेत. तर अन्य कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत. शहरातील खासगी हॉस्पिटल व परवानाधारक कोविड सेंटरमध्ये ८ ऑक्सिजन बेड व २ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध असल्याचे डॉ. अनिरुद्ध लोंढे यांनी सांगितले.
व्हेंटिलेटर आहे पण तज्ज्ञ मिळेना
पाचोड येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटर आहे. पण व्हेंटिलेटर ऑपरेटिंगसाठी तज्ज्ञ नसल्याने व्हेंटिलेटर असून उपयोग नसल्यात जमा आहे. या ठिकाणी तज्ज्ञाची नेमणूक केल्यास कोरोना रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो.
तालुक्यातील पाच टॉप गावे
पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. यात पाचोड १७१, बिडकीन १००, चितेगाव ८५, पिंपळवाडी ७७, विहामांडवा ७५ ही पाच गावे सर्वाधिक बाधित रुग्णांची गावे आहेत.