विद्यापीठाच्या २७ व्या नामविस्तार दिनानिमित्त विद्युतरोषणाईने परिसर उजळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 07:48 PM2021-01-13T19:48:45+5:302021-01-13T19:49:36+5:30
विद्यापीठाच्या नाटयगृहात बुधवारी सकाळी १०:३० वाजता राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांचे व्याख्यान होणार आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २७ वा नामविस्तार दिन गुरुवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. बुधवारी नामविस्तार दिनाच्या पुर्वसंध्येला विद्यापीठाच्या गेटची रंगरंगोटी, साफसफाई आणि आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला.
अग्निशामक दलाकडून विद्यापीठ गेट समोरील पुतळा नामांतर शहिद स्तंभ यांची स्वछता करण्यात आली. पोलीस प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष, स्वागत मंच, तीन ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिगेट्स व पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. महिला व मुलींसाठी स्वतंत्र कक्ष, मनपाकडून मोबाईल टाॅयलेट, पिण्याची पाण्याची व्यवस्था परिसरात करण्यात आली. दरम्यान, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ, अशोक बनकर, हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक सचिन सानप, मनोज पगारे व मनपा अधिकारी यांच्या कडून परिसराची पाहणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. स्वयंसेवक, समता सैनिक दल यांना सोबत घेऊन गर्दी चे व्यवस्थापन करणार येणार आहे.
सुवर्णपदकांचे वितरण
विद्यापीठाच्या नाटयगृहात बुधवारी सकाळी १०:३० वाजता राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांचे व्याख्यान होणार आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. फिजिकल डिस्टिन्सिंग ठेऊन हा कार्यक्रम होणार असुन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मुस्तजिब खान यांनी केले आहे. या कार्यक्रमात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या वार्षिक परिक्षेतील प्रथम आलेल्या गुणवतांना २५ सुर्वणपदकांचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे.
मारोती खरात यांना कुलपतींचे सुवर्णपदक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचा विद्यार्थी मारोती नामदेव खरात यास सर्वाधिक गुण घेऊन गुणवत्ता यादीत प्रथम आला आहे. यासाठी त्यांना कुलपतीचे सुवर्णपदक व श्रीमती लक्ष्मीबाई बाबुराव जाधव सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. गुरुवारी डॉ. प्रशांत नारनवरे व कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.