ओढणीने केला घात, महिलांनो दुचाकीवर बसताना घ्या काळजी; ब्रेनडेड महिलेच्या पतीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 12:28 PM2022-10-25T12:28:43+5:302022-10-25T12:29:10+5:30

अवयदानासाठी जळगावहून औरंगाबादेत, दिवाळीच्या दिवशी तिघांच्या आयुष्यात नवा ‘प्रकाश’

Odhani kills, women be careful while riding a bike; Appeal of braindead woman's husband | ओढणीने केला घात, महिलांनो दुचाकीवर बसताना घ्या काळजी; ब्रेनडेड महिलेच्या पतीचे आवाहन

ओढणीने केला घात, महिलांनो दुचाकीवर बसताना घ्या काळजी; ब्रेनडेड महिलेच्या पतीचे आवाहन

googlenewsNext

औरंगाबाद : दिवाळीच्या खरेदीसाठी दुचाकीवरून जाताना पत्नीची ओढणी अचानक चाकात अडकली आणि अपघात घडला. सुदैवाने यात मी आणि चार वर्षांची मुलगी सुखरूप वाचलो; पण ओढणीमुळे पत्नीच्या गळ्याभोवती फास बसला. तिच्या मानेला आणि नसांना गंभीर दुखापत झाली. यातच ती ब्रेनडेड झाली. मातीमोल होण्यापेक्षा तिच्या अवयवदानामुळे कोणाला तरी नवीन आयुष्य मिळाले. दुचाकीवर बसताना महिलांनी ओढणी सांभाळली पाहिजे. अशी वेळ पुन्हा कोणावरही येऊ नये, अशी भावना ब्रेनडेड महिलेच्या पतीने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

जळगाव येथील ३८ वर्षांच्या महिलेचा १६ ऑक्टोबर रोजी अपघात झाला. जळगाव येथेच महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना त्या ब्रेनडेड असल्याची लक्षणे डाॅक्टरांनी वर्तविली. जळगावमध्ये अवयदानाची सुविधा नसल्याने त्यांना २२ ऑक्टोबर रोजी रात्री औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. कोणाला तरी नवीन आयुष्य मिळेल, या भावनेने पती आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ अवयवदानाला होकार दिला. एमजीएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता आणि शल्यचिकित्सक डाॅ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी अवयवदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. डाॅ. सूर्यवंशी यांच्यासह डाॅ. मयुरी पोरे, डाॅ. प्रशांत अकुलवार, डाॅ. योगेश अडकिने, डाॅ. जिब्रान अहेमद, डाॅ. वासंती केळकर, पुणे येथील डाॅ. निनाद देशमुख, प्रत्यारोपण समन्वयक फरान हाश्मी, औरंगाबाद युथ सोशल वेलफेअर फाउंडेशनचे राजेशसिंह सूर्यवंशी आदींनी अवयवदानासाठी प्रयत्न केले.

हृदयदान टळले, दोन मूत्रपिंड, यकृताचे प्रत्यारोपण
एका मूत्रपिंडाचे एमजीएम रुग्णालयातच ३० वर्षांच्या महिलेवर आणि दुसऱ्या मूत्रपिंडाचे युनायटेड सिग्मा हाॅस्पिटमध्ये ३७ वर्षांच्या महिलेवर प्रत्यारोपण करण्यात आले. यकृत पुणे येथील रुग्णालयात दाखल ४२ वर्षांच्या पुरुष रुग्णावर प्रत्यारोपित करण्यासाठी पाठविण्यात आले. अपघात झाल्यानंतर महिलेचे हृदय ‘सीपीआर’ देऊन कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामुळे हृदयदान टळले.

२८ वे अवयवदान
अवयवदानासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. जवळपास १०० न्युरोसर्जन्सना रिपोर्ट पाठविले. अखेर अवयवदानाचा निर्णय घेतल्याचे महिलेच्या पतीने यावेळी सांगितले. मराठवाड्यातील हे २८वे अवयवदान ठरले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा अवयवदानाच्या चळवळीला पुन्हा एकदा वेग मिळाला आहे. त्यामुळे मूत्रपिंड, यकृताच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Web Title: Odhani kills, women be careful while riding a bike; Appeal of braindead woman's husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.