बनावट कागदपत्रांसह वक्फ मंडळात प्रस्ताव सादर करणाऱ्या चाैघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 02:35 PM2021-03-12T14:35:05+5:302021-03-12T14:35:47+5:30
Waqf Board आरोपींनी हडपसर येथील जनाब हजरत अब्दुल कदीर पीर दर्गा साहेबचे ट्रस्ट स्थापन करण्यासाठी औरंगाबादेतील राज्य वक्फ बोर्ड कार्यालयात प्रस्ताव सादर केला.
औरंगाबाद : हडपसर(ता. हवेली, जि. पुणे) येथील दर्ग्याच्या जमिनीसंदर्भात ट्रस्ट स्थापन करण्यासाठी बनावट कागदपत्रांसह प्रस्ताव राज्य वक्फ बोर्ड कार्यालयात सादर करणाऱ्या चार जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फारुख जलाउद्दीन सय्यद(रा.हडपसर), महेबूब अब्दुल गफ्फार शेख (रा.कावळेवाडी,हडपसर), फारुख दिलावर मनियार आणि सय्यद अनवर शमशोद्दीन सय्यद अशी आरोपींची नावे आहेत.
छावणी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मोहम्मद अमीन सय्यद (६५, रा. मोहम्मदवाडी, हडपसर) यांच्या तक्रारीनुसार आरोपींनी हडपसर येथील जनाब हजरत अब्दुल कदीर पीर दर्गा साहेबचे ट्रस्ट स्थापन करण्यासाठी औरंगाबादेतील राज्य वक्फ बोर्ड कार्यालयात प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावात तक्रारदार यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला. त्यांचे छायाचित्र आणि बनावट स्वाक्षरी करून आरोपींनी हा प्रस्ताव दाखल केल्याचे त्यांना समजले. आरोपींनी दर्गाची किमती जमीन हडपण्यासाठी हा उपद्व्याप केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. त्यांनी गुरुवारी छावणी पोलीस ठाणे गाठून याविषयी आरोपींविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.