शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी प्रेयसीविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:50 PM2019-06-02T23:50:16+5:302019-06-02T23:50:52+5:30
शिक्षक तरुणावर प्रेम असल्याचे भासवून नंतर लग्नास नकार देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी एका तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
औरंगाबाद : शिक्षक तरुणावर प्रेम असल्याचे भासवून नंतर लग्नास नकार देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी एका तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
रोशनी ऊर्फ लक्ष्मी शेट्टी, असे गुन्हा नोंद झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर विजय अंबादास हिवाळे, असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, विजय आणि रोशनी हे २०१२ पासून मुकुंदवाडीतील एका खाजगी शाळेत सहशिक्षक म्हणून एकत्र काम करायचे. या कालावधीत त्यांच्यात सुरुवातीस मैत्री आणि नंतर प्रेम झाले. रोशनीवरच्या प्रेमापोटी विजयने एका खाजगी बँकेतून अडीच लाख रुपये कर्ज घेऊन ती रक्कम तिला दिली. शिवाय मिळालेल्या वेतनाची सर्व रक्कम तो तिच्यासाठी खर्च करीत असे. मात्र, सहा महिन्यांपासून तिने विजयला भेटणे बंद केले होते. तेव्हापासून विजयला नैराश्य आले होते. अचानक नैराश्यात गेलेल्या विजयला त्याचा भाऊ अभिजित यांनी विचारणा केली असता रोशनी ऊर्फ लक्ष्मी शेट्टी हिच्यावर त्याने जिवापाड प्रेम केले. तिला पैसेही दिले. मात्र, ती पैसे घेईपर्यंत गोड बोलते आणि नंतर भेटत नाही. तिने पैशासाठी प्रेमाचे नाटक केल्याने मला मानसिक धक्का बसल्याचे त्याने अभिजितला सांगितले होते. दरम्यान, १ जून रोजी विजयने आदर्श कॉलनीतील घरात विष पिऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. याप्रकरणी विजयचा भाऊ अभिजित यांनी शनिवारी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून रोशनी ऊर्फ लक्ष्मी शेट्टीविरोधात गुन्हा नोंदविला.