कंत्राटदाराची ३० लाखाची फसवणूक, बिल्डरसह तीन जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 06:51 PM2019-10-04T18:51:49+5:302019-10-04T19:01:00+5:30
अर्धवट बांधकाम झालेले फ्लॅट दाखवत विश्वास संपादन केला
औरंगाबाद: फ्लॅटचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यासाठी अर्थसहाय्य करा आणि फ्लॅट विक्रीतून येणारा नफा तुम्हाला देतो,असे सांगून कंत्राटदाराची तब्बल ३० लाखाची फसवणुक करण्यात आल्याचे समोर आले. याविषयी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात बिल्डर आणि त्याच्या दोन साथीदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
मनोज हुकूमचंद चांदिवाल(४६,रा. सह्याद्री हिल, गारखेडा), अमीत अरविंद धारूरकर (४७,रा. ज्योतीनगर) आणि बिल्डर प्रफुल्ल माधवराव मांडे( सिडको एन-४)अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील रहिवासी सचिन रमनलाल कासलीवाल हे सरकारी कंत्राटदार आहेत. २०१७ मध्ये त्यांची आरोपी मनोज चांदीवालसोबत ओळख झाली होती. त्यानंतर काही दिवसानंतर मनोजने त्यांची आरोपी अमीत आणि बिल्डर मांडे यांच्यासोबत भेट करून दिली होती. बिल्डर मांडे यांच्या विविध बांधकामाच्या साईट्स पैशाअभावी बंद पडल्याचे सांगितले. काही फ्लॅटचे किरकोळ बांधकाम केल्यानंतर त्यांची विक्री होणार आहे. या बांधकामासाठी तुम्ही आम्हाला ३० लाख रुपये दिले तर फ्लॅट विक्र ीनंतर तुम्हाला ४० लाख रुपये परत करतो, असे सांगितले. कासलीवाल यांचा विश्वास बसावा याकरीता आरोपींनी विविध ठिकाणच्या बांधकाम साईटवर नेवून अर्धवट बांधकाम झालेले फ्लॅट दाखविले.
आरोपींवर विश्वास बसल्याने कासलीवाल यांनी त्यांना ७ लाख रुपये रोख आणि २० लाख रुपये किमतीचे बांधकाम साहित्य खरेदी करून दिले. शिवाय अन्य किरकोळ कामासाठी आणखी तीन लाख रुपये दिले. यानंतर आरोपींनी त्यांच्या फ्लॅटचे बांधकाम पूर्ण केले आणि ते फ्लॅट विक्री केले. मात्र ठरल्यानुसार त्यांनी कासलीवाल यांना ४० लाख रुपये परत केले नाही. सुरवातील काही दिवस त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून पैसे पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे मुद्दल रक्कम परत करण्याचे सांगितले.
धनादेश केला अनादर
कासलीवाल यांच्याकडून पैशासाठी तगादा सुरू होताच आरोपींनी प्रथमेश कन्स्ट्रक्शन कंपनीचा १७ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश त्यांना दिला. हा धनादेश कासलीवाल यांनी बँकेत वटविण्यासाठी टाकला. मात्र तत्पूर्वीच आरोपींनी बँकेला पत्र देवून तो धनादेश वटवू नका,असे कळविले. यामुळे बँकेने धनादेश न वटताच परत केला. आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच कासलीवाल यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे तपास करीत आहे.