मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा
By बापू सोळुंके | Published: August 4, 2024 06:14 PM2024-08-04T18:14:53+5:302024-08-04T18:15:13+5:30
मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने याविषयी तक्रार नोंदवली.
बापू सोळुंके, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी फेसबुक या समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात शनिवारी रात्री मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने याविषयी तक्रार नोंदवली. प्रशांत रामकृष्ण येनगे (रा. कामगार चौक, सिडको)असे गुन्हा नोंद झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी भरत कदम यांनी याविषयी मुकुंदवाडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, ३० जुलै रोजी रात्री ते फेसबुकवर त्यांचे अकाऊंट पहात असताना त्यांच्या ओळखीचे प्रशांत येनगे यांने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर टाकलेली पोस्ट वाचली. यात नमूद होते की, माध्यमांनीही साथ सोडली, जरांगेच्या निशाण्यांवर फक्त भाजप, देवेंद्र फडणवीस यांचेवर अतिशय खालच्या पातळीवर टीका, असा मजकुर व त्यामध्ये जरांगे यांचा फोटो व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो खाली तुतारीकडून सुपारी घेऊन महाराष्ट्रात जातीयवादाचं विष पेरणाऱ्या जरांगेला नियती धडा शिकवणार'असा मजकुर लिहिलेला होता.
मराठा समाज आणि अन्य समाजामध्ये द्वेष व शत्रूत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने येनगे यांनी ही पोस्ट टाकल्याचे कदम यांनी तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी येनगेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५३(२) आणि भारतीय न्याय संहिता कलम ३५३(१)(सी) नुसार गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक डाके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.