मनपा प्रशासनाचा पदाधिकाऱ्यांना ठेंगा
By Admin | Published: August 24, 2016 12:36 AM2016-08-24T00:36:08+5:302016-08-24T00:50:37+5:30
औरंगाबाद : शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. ११५ वॉर्डांमधील विकास ठप्प पडलेला असताना मागील काही दिवसांपासून महापालिकेत प्रशासनाविरुद्ध
औरंगाबाद : शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. ११५ वॉर्डांमधील विकास ठप्प पडलेला असताना मागील काही दिवसांपासून महापालिकेत प्रशासनाविरुद्ध पदाधिकारी असा सामना रंगला. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत नेहमीप्रमाणे आयुक्त गैरहजर होते. अतिरिक्त आयुक्तांनीही पाठ फिरविली. त्यामुळे संताप अनावर झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार तोफ डागली. सर्वसाधारण सभा, स्थायी समितीने दिलेल्या सूचनांना प्रशासनाकडून चक्क केराची टोपली दाखविण्यात येत असेल तर बैठक कशासाठी घ्यायची.... बैठक तहकूब करा...जोपर्यंत स्वत: आयुक्त येणार नाहीत, तोपर्यंत बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मागील काही दिवसांपासून मनपा प्रशासनाचे एकला चलो रे....धोरण सुरू झाले आहे. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमधील संवाद खुंटला आहे. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरू आहे. शहरातील सुजाण नागरिकांनी आम्हाला विकासकामे करण्यासाठी महापालिकेत पाठविले आहे. प्रशासन आमचे म्हणणे ऐकतच नसेल तर काय उपयोग अशी भावना नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये वाढू लागली आहे. कोणतेही विकास काम सांगितले तर निधी नाही....एवढेच सांगण्यात येते. निधी कसा उभा करावा याचाही मार्ग पदाधिकाऱ्यांनी दाखविला. त्यावरही अंमलबजावणी करण्यास प्रशासन तयार नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून पदाधिकारी व प्रशासन यांच्यात संघर्षाचा भडका उडत आहे.
मंगळवारी सकाळी स्थायी समितीची बैठक सुरू झाली. बैठकीस मोठ्या उत्साहाने सर्व नगरसेवक उपस्थित होते. मनपा आयुक्त नेहमीच बैठकीला येत नाहीत.
आजही ते आले नाहीत. अतिरिक्त आयुक्त रमेश पवारही गैरहजर दिसले. त्यांच्या जागेवर उपायुक्त रवींद्र निकम यांना प्राधिकृत करण्यात आले होते. निकम यांना आयुक्तांच्या खुर्चीवर पाहून सदस्यांची सटकली.
नगरसेवक सीताराम सुरे यांनी आयुक्त बैठकीस उपस्थित राहणार नसतील तर आमची येथे चर्चा निरर्थक आहे. आमचे दु:ख, गाऱ्हाणे कोण ऐकणार आहे. उपायुक्त निकम यांना कारवाईचे अधिकारच नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आयुक्त ओम प्रकाश बकोरिया स्वत: येत नाहीत तोपर्यंत बैठक तहकूब करा अशी मागणी सर्व सदस्यांनी केली.
सभापती मोहन मेघावाले यांनी बैठक तहकूब केली. २६ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता तहकूब बैठक घेण्यात येणार आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे मंगळवारी सकाळीच मनपात दाखल झाले. त्यांनी स्थायी समितीमधील शिवसेनेच्या सदस्यांसोबत बैठक घेतली. यापूर्वी काही सेना नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार घातला होता.
सेनेचे सभापती असताना पक्षातील नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार घातल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. दानवे यांनी सर्व सदस्यांना योग्य त्या सूचना दिल्या. पक्षात कसे वागावे याची माहिती दिली. ऐनवेळीच्या मुद्यावरून काही नगरसेवक नाराज होते, त्यांची नाराजी दूर केल्याचेही दानवे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.