लोकप्रतिनिधी विरुद्ध पदाधिकारी;वैजापूर शिवसेनेतील गटबाजीची ‘मातोश्री’ने घेतली गंभीर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 04:22 PM2022-02-17T16:22:49+5:302022-02-17T16:25:00+5:30
गेल्या महिन्यांतील घटनेप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी पक्ष सचिवांना पत्र देऊन संघटनेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
औरंगाबाद : वैजापूर तालुका शिवसेनेत गेल्या महिन्यांत झालेल्या राड्याप्रकरणी ‘मातोश्री’ ने गांभीर्याने दखल घेतली आहे. लोकप्रतिनिधी विरुद्ध संघटना पदाधिकारी असे काही चित्र तालुक्यात निर्माण झाल्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेतृत्व याबाबत विचार करू लागले आहे. आगामी जि.प. आणि पं.स. निवडणुकीवर अंतर्गत गटबाजीचा परिणाम होऊ नये, यासाठी पक्षपातळीवरून समज देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
गेल्या महिन्यांतील घटनेप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी पक्ष सचिवांना पत्र देऊन संघटनेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमुळेच पक्षाने वैजापूरमधील शिवसेनेतील गटबाजीचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वाद ‘मातोश्री’पर्यंत गेला आहे. गेल्या महिन्यांत आ.रमेश बोरनारे, माजी तालुकाप्रमुख संजय निकम व उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, माजी जि.प. सदस्य मनाजी मिसाळ यांच्यात वाद झाला होता. जिल्हाप्रमुख आ.दानवे यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत निकम यांनी काही तक्रारी मांडल्या होत्या. त्यामुळे ती बैठक संपल्यानंतर दोन्ही गटांत वाद झाले होते. त्यानंतर, दोन्ही गटांकडून सारवासारव करत, असे काही घडलेच नसल्याचे सांगण्यात आले.
मात्र, दोन्ही गटांनी परस्परांच्या विरोधात थेट मातोश्रीपर्यंत तक्रारी केल्या. निकम यांनी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. आ.बोरनारे हे पक्षपाती काम करीत आहेत. ते कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे, तर आ.बोरनारे यांनीही जिल्हाप्रमुखांमार्फत निकम यांना पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना सचिवांकडे केली. दुसरीकडे शिवसेनेचे शिष्टमंडळ खैरे यांना भेटले, त्यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी केली. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई झाली नसली, तरी पक्षपातळीवर चिंतन सुरू असल्याची चर्चा सेनेच्या गोटात आहे.
स्थानिक नेत्यांनी घेतला आढावा
जिल्हा प्रमुख आ.अंबादास दानवे यांनी सांगितले, हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर गेले आहे, याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील, तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले, संघटनेला हानीकारक असणाऱ्यांवर कारवाईच्या अनुषंगाने मातोश्रीवर पत्र पाठविले आहे.