महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयाचा गलथान कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:17 AM2017-08-28T00:17:41+5:302017-08-28T00:17:41+5:30
ऐन सण- उत्सवाच्या काळातही महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयाचा गलथान कारभार सुरूच आहे. गणेश चतुर्थीपासून सातत्याने या भागात वीजपुरवठा खंडित होत असून शनिवारी रात्रभर खंडित झालेला वीजपुरवठा रविवारीही दिवसभर सुरळीत झाला नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ऐन सण- उत्सवाच्या काळातही महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयाचा गलथान कारभार सुरूच आहे. गणेश चतुर्थीपासून सातत्याने या भागात वीजपुरवठा खंडित होत असून शनिवारी रात्रभर खंडित झालेला वीजपुरवठा रविवारीही दिवसभर सुरळीत झाला नव्हता.
एमआयडीसी कार्यालयांतर्गत असलेल्या वीज ग्राहकांना या कार्यालयाच्या गलथान कारभाराचा मोठा फटका मागील चार महिन्यांपासून बसत आहे. दररोज या भागात वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत कर्मचाºयांकडूनही ग्राहकांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने अबालवृद्धांची गैरसोय होत आहे.
शुक्रवारी श्री गणरायाचे आगमन मोठ्या थाटात झाले. नवीन नांदेड भागात जवळपास दोनशेंहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. पहिल्याच दिवशी रात्री वीजपुरवठा खंडित झाला. तो कसाबसा रात्री उशिरा सुरू केला. दुसºया दिवशीही तोच कित्ता महावितरणने गिरवला.
एमआयडीसी कार्यालयांतर्गत येणाºया वसरणी, दूध डेअरी, महसूल कॉलनी, शिवशंकरनगर, यशोधरानगर आदी भागात दररोज या ना त्या कारणाने वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत महावितरणकडून लोड जास्त झाल्याचे कारण दिले जात आहे. या भागातील वीज व्यवस्था सुधारण्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले जात नाही. या भागात महावितरणने पावसाळापूर्व कामे केलीत की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या भागातील रोहित्रही अतिशय धोकादायक अवस्थेत आहेत. त्याकडेही महावितरणने दुर्लक्ष केले आहे. वसरणी ते नावघाट पूल या दरम्यानचे विद्युत पोल कधीही कोसळतील, अशा अवस्थेत आहेत. याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही.