अधिकारी बॅकफूटवर; कर्मचारीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:05 AM2021-01-17T04:05:16+5:302021-01-17T04:05:16+5:30
पोहोचविणार लसीकरणाचा संदेश संघटनांचे प्रतिनिधींचाही पुढाकार : ५० वर्षांवरील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनीही घेतली लस औरंगाबाद : आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी ...
पोहोचविणार लसीकरणाचा संदेश
संघटनांचे प्रतिनिधींचाही पुढाकार : ५० वर्षांवरील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनीही घेतली लस
औरंगाबाद : आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोरोना लसीकरणाच्या सोहळ्यात तर कनिष्ठ कर्मचारी पुढाकार घेऊन लस टोचून घेण्यात आघाडीवर असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत लसीकरणाचा संदेशही आरोग्य कर्मचारीच पोहोचविणार असल्याचे दिसते.
अनेक ५० वर्षांवरील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनीही लस घेतली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लस घेतल्याचे पहायला मिळाले नाही. त्यामुळे लसीकरणाचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यावरच पडली आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी आरोग्य संघटनांच्या प्रतिनिधींनी लस घेऊन खासगी रुग्णालयांतील आरोग्य कर्मचाऱ्यांत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे पहायला मिळाले. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले की, लसीकरणाचा निर्णय हा वैयक्तिक असतो. आरोग्य अधिकाऱ्यांनी लस घेतली का, त्यांची नावे याविषयी माहिती देता येणार नाही.
सामाजिक माध्यमांवर फोटो
लस घेतल्यानंतर अनेकांनी सामाजिक माध्यमांवर स्वत:चे फोटो शेअर केले. त्यामुळे लसीकरणासंदर्भात सर्वसामान्य लोकांमध्ये असलेली भीती दूर होण्यास हातभार लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.
घाटीच्या वैद्यकीय अधीक्षकांनी घेतली लस
घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी पहिल्या दिवशी लस घेतली. विशेष म्हणजे लसीकरणाच्या यादीत नाव असूनही दोन सुरक्षारक्षक लस घेणे टाळत होते; परंतु डॉ. हरबडे यांनी घेतल्यानंतर त्यांनीही लस घेतली. त्यामुळे घाटीतील कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्रेरणा मिळाली.
नवजात शिशू विभागप्रमुख डॉ. एल. एस. देशमुख यांनीही लस घेतली. यासह इतर वरिष्ठ डॉक्टरांनी लस घेण्यास प्राधान्य दिले. घाटीत पहिल्या दिवशी ३२ डॉक्टर आणि ४२ कर्मचाऱ्यांनी लस घेतली.
फोटो ओळ...
घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी पहिल्या दिवशी लस घेतली.