अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहिले नाही तर होईल कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:02 AM2021-09-10T04:02:12+5:302021-09-10T04:02:12+5:30
लासूर स्टेशन : शिक्षक गावात निवासाला राहिले तर त्या गावातील विद्यार्थ्यावर त्यांचा प्रभाव राहतो, यात शंकाच नाही; परंतु हल्ली ...
लासूर स्टेशन : शिक्षक गावात निवासाला राहिले तर त्या गावातील विद्यार्थ्यावर त्यांचा प्रभाव राहतो, यात शंकाच नाही; परंतु हल्ली शिक्षक शाळेच्या मुख्यालयी राहत नसल्याचे दिसून येत आहे. यांसदर्भात लोकप्रतिनिधी या नात्याने बोललो नाही. परंतु यापुढे असे चालणार नाही. २० सप्टेंबरनंतर गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मुख्यालयीच निवासाला राहावे, जेणेकरून नागरिकांची कामे मार्गी लागण्यास मोठा फायदा होईल, असे निर्देश आमदार प्रशांत बंब यांनी दिले.
नागपूर-मुंबई महामार्गावर लासूर स्टेशन शिवारातील एका लॉन्सवर गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना आमदार बंब बोलत होते.
याप्रसंगी विविध शाळांतील मुख्याध्यापकांनी शाळेचे वीजबिल, इमारत बांधकाम आदींबाबत निधी मिळत नसल्याने कामे खोळंबल्याची समस्या आमदारांसमोर मांडली. तेव्हा प्रत्येक ग्रामपंचायतीला १५व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून निधी देण्यासाठी पत्र लिहून सांगतो. असे बंब यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे, सभापती गणेश अधाने, उपसभापती सुमित मुंदडा, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवनाथ मालकर, सरपंच मीना संजय पांडव, नारायण वाकळे, अमोल जाधव, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, तलाठी आदींची उपस्थिती होती.