शहर साफसफाईसाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी दिले झोकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:27 PM2018-07-31T15:27:20+5:302018-07-31T15:36:25+5:30
इंदोर झाले चकाचक, औरंगाबाद का नाही ? : इंदौरमधील कचरा सफाईसाठी वॉर्ड टू वॉर्ड कोणते धोरण राबविण्यात आले. नागरिकांनाही आपले शहर स्वच्छ राहावे, असे वाटावे, अशी कोणती कामे तेथील महापालिकेने केली, अधिकाऱ्यांनीही कशी जबाबदारी सांभाळली, यासंबंधीची माहिती आजच्या दुसऱ्या भागात.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : इंदौर महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी सफाईसाठी स्वत:ला झोकून दिले आहे. सकाळी, संध्याकाळी आणि रात्री शहरात साफसफाई करण्यात येते. निव्वळ औपचारिकता म्हणून कोणीच काम करीत नाही. जे करायचे ते अगदी मनापासून, म्हणूनच शहराने देशात अव्वल येण्याचा मान पटकावला.
३२ लाख लोकसंख्येसाठी मनपाचे ८५ निवडणूक वॉर्ड आहेत. सकाळी ६ वाजेपासून प्रत्येक वॉर्डात डोअर टू डोअर कचऱ्याचे कलेक्शन केले जाते. कचऱ्याच्या गाडीसोबत चालक, एक कर्मचारी आणि कंत्राट दिलेल्या स्वयंसेवी संस्थेचा कर्मचारी असतो. नागरिकांशी मधुर वाणीत संवाद साधण्याचे काम एनजीओचा कर्मचारी करतो. प्रत्येक रिक्षाला जीपीआरएस यंत्रणा आहे.
रिक्षाच्या काचेवर रूटमॅप दिलेला असतो. एक गल्ली रिक्षाने कचरा न घेता ओलांडल्यास त्वरित मनपाच्या कंट्रोल रुममधून संबंधित वॉर्डाच्या जवानाला वॉकीटॉकीवर निरोप देण्यात येतो. अवघ्या दोन ते पाच मिनिटांत चूक दुरुस्त केल्या जाते. रिक्षात ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. सॅनेटरी नॅपकिन, डायपरसाठी तिसरे डसबिन कचऱ्याला लावलेले आहे. वॉर्ड क्र. ३२ मधील विजयनगर येथील कचरा कलेक्शनचे काम थक्क करणारे होते.
एका रिक्षाला १५०० घरांमधून कचरा घेणे बंधनकारक आहे. प्रसिद्ध पार्श्वगायक शान याने स्वरबद्ध केलेले ‘इंदौर को स्वच्छ बनाना है, अब हमने यह ठाना है...स्वच्छ इंदौर...’ गाणे लोकप्रिय ठरले आहे. या गाण्याची धून ऐकू येताच नागरिक घरासमोर दोन डसबिन घेऊन उभे राहतात. संध्याकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत व्यावसायिक क्षेत्रातील कचरा जमा करण्यात येतो.
एकही घर सुटत नाही
वॉर्ड क्र. ३२ मधील विजयनगर येथे कलेक्शनच्या कामावर देखरेख करणारे जवान विनयकुमार यांनी सांगितले की, सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत कचरा जमा करण्याचे काम आमची यंत्रणा करते. एकही घर सुटणार नाही, याची काळजी घेतो. रस्त्यावर कोणी कचरा टाकला तर त्वरित त्याला दंडही आकारतो.
‘सफाई मित्र’
भौगोलिकदृष्ट्या औरंगाबाद शहरापासून तीनपट मोठ्या असलेल्या इंदौैर शहरात मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते स्वच्छ करण्यासाठी ७ हजार कर्मचारी आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला ८०० मीटर सफाईचे उद्दिष्ट दिले आहे. ठरवून दिलेल्या परिसरात कचरा दिसून आल्यास कर्मचारी जागेवरच निलंबित केला जातो. त्याच्या जागेवर दुसऱ्या दिवशी कोण काम करणार हे सुद्धा निश्चित होते. तो सुटीवर असेल तर तिसरा कर्मचारी कोण? हे सुद्धा वॉर्डाचा जवान निश्चित करतो. सफाई मित्र मनपाच्या आस्थापनेवरील कर्मचारी असून, त्यांना फक्त ९ हजार पगार देण्यात येतो.
आठ ट्रान्स्फर सेंटर
रिक्षात जमा झालेला कचरा त्वरित जवळच्या ट्रान्स्फर सेंटरवर नेऊन रिकामा करण्यात येतो. वॉर्ड क्र. ३२ मधील कचरा स्टार चौराहा येथील सेंटरवर नेण्यात आला. येथे अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कचरा रिक्षातून आपोआप रिकामा होतो. ओला व सुका कचरा मोठ्या प्लास्टिक कंटेनरमध्ये टाकून देवपुरीया येथील मुख्य प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येतो. एका कंटेनरमध्ये किमान ३५ रिक्षांचा कचरा बसतो. प्रत्येक सेंटरवर अत्याधुनिक संगणकीय यंत्रणा बसविली आहे. रिक्षासह कचऱ्याचे वजनही येथेच होते. दिवसभरात ९० ते १०० मेट्रिक टन कचऱ्याचे कलेक्शन या केंद्रावर होते, असे स्टेशन मॅनेजर आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले. येथील सर्व अत्याधुनिक यंत्रणा फक्त ५ कोटींची असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वच्छतेने उत्साह वाढला
वसाहतीत कुठेच अस्वच्छता दिसून येत नाही. नागरिकही आता रस्त्यावर कचरा टाकत नाहीत. मनपाचे कर्मचारी प्रत्येक गल्लीत साफसफाई उच्च दर्जाची करतात. सफाईचे हे काम पाहून आमचाही उत्साह वाढतो.
- मालती भावसार, गृहिणी.
रोगराई संपली
अस्वच्छतेमुळे पूर्वी रोगराईचे प्रमाण खूप होते. आता सर्व निरोगी राहतात. कॉलनीत कुठेच कचरा दिसून येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डासांचे प्रमाण कमी झाले आहे.
- अन्नू पटेल, गृहिणी.