अधिकारी, कर्मचारी गायब; कक्षाला टाळे
By Admin | Published: May 17, 2017 12:17 AM2017-05-17T00:17:27+5:302017-05-17T00:26:46+5:30
ईट : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सोमवारी सायंकाळी भेट दिली असता रुग्णालय वाऱ्यावर सोडून अधिकारी, कर्मचारी गायब असल्याचे दिसून आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
ईट : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सोमवारी सायंकाळी भेट दिली असता रुग्णालय वाऱ्यावर सोडून अधिकारी, कर्मचारी गायब असल्याचे दिसून आले़ त्यावेळी तेथे आलेल्या अपघातात जखमीला नाविलाजाने खासगी रुग्णालय गाठून औषधोपचार घ्यावे लागले़
ईटसह परिसरातील २४ गावातील नागरिकांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य सेवा मिळते़ या आरोग्य केंद्रांतर्गत पखरूड, गिरवली व सुकटा ही तीन उपकेंद्रे आहेत़ सोमवारी सायंकाळी १ ते रात्री १० या वेळेत येथील रुग्णालयातील कामकाजाची पाहणी केली़ सायंकाळी ७ वाजता रुग्णालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी गायब असल्याने आरोग्य केंद्रात शुकशुकाट होता़ वैद्यकीय अधिकारी कक्ष, मुख्य दरवाजा, औषध निर्माण अधिकारी कक्ष, पर्यवेक्षक कक्ष बंद अवस्थेत दिसून आले़ त्याचवेळी पखरूड- आंद्ररूड रस्त्यावर दुचाकीने ठोकरल्याने एक चार वर्षीय बालक जखमी झाला होता़ त्याला नातेवाईकांनी येथे उपचारासाठी आणले होते़ मात्र, कोणीच उपस्थित नसल्याने त्यांना खासगी रुग्णालय गाठावे लागले़
या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत़ अंतररुग्ण, बाह्यरुग्ण तपासणीसह शिबीरे व इतर शासकीय कामकाज याच अधिकाऱ्यांना पहावे लागते़ एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह तीन परिचर, एक आरोग्य सहायिका, एक आरोग्य सहाय्यक, एक औषध निर्माण अधिकारी, एक नर्स, एक चालक व एमपीडब्ल्यू हे पद रिक्त आहे़ रिक्तपदांमुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे़ उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा ताण पडत असून, रुग्णसेवेवरही याचा परिणाम होत आहे़ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रिक्तपदे भरण्यासह आवश्यक सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे़