आचारसंहितेच्या धसक्याने अधिकारी -कर्मचाऱ्यांचा व्हाटस् अॅप ग्रुपला रामराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 08:27 PM2019-03-13T20:27:17+5:302019-03-13T20:27:40+5:30
आचारसंहितेच्या काळात सोशल मीडियावर असलेल्या राजकीय ग्रुपमध्ये राहणे टाळण्याच्या सूचना
लासूर स्टेशन (औरंगाबाद) : सोशल मीडिया यंदाच्या निवडणुकीत आचारसंहितेच्या कक्षेत आल्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. आचारसंहितेचा भंग करणारी एखादी राजकीय पोस्ट आपल्याला चांगलीच डोकेदुखी ठरू शकते, त्यामुळे व्हाट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट झालेले बरे, असे म्हणत अनेक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्हाट्स अॅप ग्रुपला रामराम ठोकला आहे.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपरिचित असलेल्या युवकांसह नागरिकांनी तयार केलेल्या व्हाटस् अॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतलेले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक पोस्ट टाकल्या जातात. परंतु आता लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भीती वाटू लागली आहे. एखादी पोस्ट आपल्या अंगलट येऊ नये म्हणून त्या पहिलेच ‘लेफ्ट’ झालेले बरे, असे म्हणून ग्रामीण भागातील अधिकारी-कर्मचारी सोशल मीडियापासून दूर जात आहेत.
आचारसंहितेच्या काळात सोशल मीडियावर असलेल्या राजकीय ग्रुपमध्ये राहणे टाळावे, अशा आम्हाला सूचना असतात. राजकीय वक्तव्यांशी आमचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे निवडणूक काळात सोशल मीडियापासून बाजूला झाल्याची प्रतिक्रिया ‘आपलं लासूर सुंदर लासूर’ या व्हाटस् अॅप ग्रुपमधून बाहेर पडलेले गटविकास अधिकारी विद्याधर पाटील यांनी दिली.