अधिकाऱ्यांचे पगार हजारोत; लाचेचे उड्डाण लाखोत; लाच घेण्यात पोलीस विभागाच आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 07:13 PM2022-06-11T19:13:31+5:302022-06-11T19:13:51+5:30
एसीबीच्या पथकांनी केलेल्या २२ कारवायांमध्ये २६ जणांवार लाच घेताना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे गुन्हे नोंदविले आहे.
- राम शिनगारे
औरंगाबाद : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १ जानेवारी ते ८ जून २०२२ या कालावधीत लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण २२ प्रकरणांमध्ये २६ लाचखोरांना पकडण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांना २ हजार रुपयांपासून तीन लाख रुपयांपर्यंत लाचेची मागणी केली आहे. यातील काही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. यातील महिला आरोपी वगळता उर्वरित सर्वांना अटक केल्याची आकडेवारी एसीबीच्या संकेतस्थळावर दिली आहे.
लाचखोरीत पोलीस विभाग एक नंबर
औरंगाबाद जिल्ह्यात या वर्षात एकूण २२ जणांना लाच घेताना पकडले आहे. त्यामध्ये सर्वाधिक संख्या पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. सहा प्रकरणात सात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडले.
लाचखोरीत कोणत्या विभागाचे किती?
जिल्ह्यात लाच घेतलेल्या २२ प्रकरणांमध्ये पोलीस विभागातील ६, मनपा ३, जिल्हा परिषद ३, महसूल २, बांधकाम विभागातील २ आणि आरोग्य, महावितरण, शिक्षण, वक्फ बोर्ड आणि धर्मदाय विभागातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सर्वाधिक सापळे मार्चमध्ये
एसीबीच्या विविध पथकांनी औरंगाबाद जिल्ह्यात १ जानेवारी ते ८ जून २०२२ या कालावधीत २२ प्रकरणांमध्ये लाच घेताना पकडले आहे. यातील सर्वाधिक सात कारवाया मार्च महिन्यात करण्यात आल्या. त्यानंतर एप्रिल आणि फेब्रुवारी महिन्यात प्रत्येकी चार, मे महिन्यात तीन, जानेवारी महिन्यांत दोन आणि चालू महिन्यातील आठ दिवसांमध्ये दोनजणांना लाच घेताना पकडले आहे.
मालमत्ता गोठविण्यासाठी प्रस्ताव नाही
शहरासह जिल्ह्यात एकाचीही मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव एसीबीने तयार केलेला नसल्याची माहिती समोर आली.
२६ जणांवर गुन्हे, ९० टक्के अटक
एसीबीच्या पथकांनी केलेल्या २२ कारवायांमध्ये २६ जणांवार लाच घेताना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे गुन्हे नोंदविले आहे. त्यापैकी २० पेक्षा अधिक जणांना अटक केली होती. त्यातील अनेकांना न्यायालयाकडून पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर नियमित जामिनावर सुटका करण्यात आली. २२ पैकी एकाही प्रकरणाचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलेले नाही.
एसीबीला कळवा
नागरिकांनी कोणत्याही कामांसाठी लोकसेवक पैशाची मागणी करीत असेल तर एसीबीला कळविले पाहिजे. त्यांच्यावर एसीबीकडून तत्काळ कारवाई केली जाईल.
- डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, एसीबी