अधिकाऱ्यांची कोंडी
By Admin | Published: February 17, 2016 11:45 PM2016-02-17T23:45:24+5:302016-02-17T23:47:29+5:30
नांदेड : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महिला व बालकल्याण विभागातील अखर्चित बाचाबाची झाली़ तेव्हा काही वेळ तणाव निर्माण झाला़
नांदेड : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महिला व बालकल्याण विभागातील अखर्चित निधीवरून माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, सभापती संजय बेळगे, सदस्य पुरूषोत्तम धोंडगे यांच्यात बाचाबाची झाली़ तेव्हा काही वेळ तणाव निर्माण झाला़
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा मंगला गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली़ सभेत सुरूवातीपासूनच माजी अध्यक्ष बेटमोगरेकर यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले़ प्रत्येक विषयावर अधिकाऱ्यांची कोंडी करताना बेटमोगरेकर यांनी पदाधिकाऱ्यांनाही कानपिचक्या दिल्या़ त्यामुळे पदाधिकाऱ्यांची काही वेळ अडचण झाली़ महिला व बालकल्याण विभागातील अंगणवाडी बांधकामच्या १० कोटींच्या अखर्चित निधीचा विषय सभागृहात सुरू होता़ सभापती संजय बेळगे या विषयावर स्पष्टीकरण देत असताना माजी अध्यक्ष बेटमोगरेकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देण्याची सूचना केली़ या सूचनेला सभापती बेळगे यांनी विरोध दर्शविला़ सदस्य पुरूषोत्तम धोंडगे यांनीही माजी अध्यक्ष बेटमोगरेकर यांच्या भूमिकेला कडाडून विरोध केला़ त्यामुळे धोंडगे व बेटमोगरेकर यांच्यात खडाजंगी झाली़ तेव्हा उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, सभापती बेळगे, स्वप्नील चव्हाण, दिनकर दहिफळे यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर हे प्रकरण शांत झाले़
दरम्यान, माजी अध्यक्ष बेटमोगरेकर यांनी सभेच्या सुरूवातीस सभा अहवालातील त्रुटीसंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला़ १४ डिसेंबर २०१५ चे दोन सभा अहवाल कसे, तसेच मनरेगाच्या ठरावावर चर्चा न होताच ते मंजूर कसे झाले, अशा प्रश्नांचा भडीमार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांच्यावर केला़़ जि़ प़ सदस्या सारिका पवार यांनी कनिष्ठ अभियंता दयानंद शिंदे यांची पंचायत समिती, हदगाव येथील प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी करत पदाधिकाऱ्यांच्या आसनासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले़ सेनेचे गटनेता नागोराव इंगोले, वत्सला पुय्यड यांनीही सहभाग घेतला़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड यांनी शिंदे यांची नियमानुसार प्रतिनियुक्ती रद्द करण्याच्या सूचना दिल्या़ त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ सदस्य अशोक पाटील रावीकर यांनी आठ निमशिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश अनधिकृत असल्याचे सांगितले़ बेळगे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले़ समाजकल्याण अधिकारी सुधीर खमितकर यांच्या वरील कारवाई संदर्भात सदस्या मंगाराणी अंबुलगेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले़ दरम्यान, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी माळेगाव यात्रेतील कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना लाभ झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला़ (प्रतिनिधी)