अरे देवा! ती शाळा तर आता बंद झाली; मुलांचे काय? पालकांच्या चिंतेत वाढ
By विजय सरवदे | Published: March 29, 2023 05:10 PM2023-03-29T17:10:56+5:302023-03-29T17:12:22+5:30
शिक्षण विभागाच्या कार्यवाहीमुळे एटीआय इंग्लिश हायस्कूलला टाळे
छत्रपती संभाजीनगर : ‘पालकांनो शाळा अधिकृत असल्याची खात्री केलीय?’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच शिक्षण विभागाने सातारा परिसरातील एटीआय इंग्लिश स्कूलची झाडाझडती घेतली. तेव्हा ती शाळा अनधिकृतपणे स्थलांतरित झाल्याचे स्पष्ट झाले आणि शाळा ताबडतोब बंद करण्याचे आदेश बजावले. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया थांबवून शाळा व्यवस्थापनाला शाळेला टाळे ठोकावे लागले.
‘लोकमत’ने १५ मार्च रोजी या शाळेसह जिल्ह्यातील अनधिकृत शाळा सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी ॲक्शन मोडवर आले. वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथील मूळ मान्यता असलेली एटीआय इंग्लिश स्कूल सातारा परिसरातील एका इमारतीत उघडण्यात आली. शाळा व्यवस्थापनाने नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रियाही सुरू केली. पालकांनीही मागचा पुढचा विचार न करता आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी रांगा लावल्या.
दरम्यान, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या सूचनेनुसार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी त्या शाळेला भेट देऊन चौकशी केली. शाळा सुरू करण्याची शासनाची मान्यता, स्थलांतरित झाली असेल, तर स्थलांतरणासाठी शासनाच्या मान्यतेच्या आदेशाची मागणी केली. तेव्हा मुख्याध्यापकांनी मान्यतेचा एकही पुरावा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना सादर केला नाही. विस्तार अधिकाऱ्यांनी तसा अहवाल त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानंतर ही शाळा ताबडतोब बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनाला बजावले.
तेव्हा जोगेश्वरी येथून सातारा परिसरात शाळा स्थलांतरणासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रवेशप्रक्रिया सुरू केल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. मात्र, सध्या शाळेकडे स्थलांतरणाची शासन मान्यता नाही. जेव्हा मान्यता मिळेल, तेव्हा शाळा सुरू करा. आता ही शाळा बंद करा, असा पवित्रा शिक्षण विभागाने घेताच शाळा व्यवस्थापन नरमले व सुरू असलेली प्रवेशप्रक्रिया थांबवून शाळा बंद करण्यात आली. यास शिक्षण अधिकारी देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.
पालकांच्या चिंतेत वाढ
नव्याने उघडलेल्या एटीआय इंग्लिश स्कूलमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी पालकांची झुंब्बड उडाली होती. मात्र, शिक्षण विभागाच्या आदेशामुळे ही शाळा आता बंद झाली आहे. त्यामुळे शुल्क भरून प्रवेश घेतलेले पालक चिंतेत पडले असून भरलेले शुल्क परत घेण्यासाठी शाळा व्यवस्थापनाकडे तगादा लावला आहे.