अरेच्या असं कसं? मनपाच्या प्रवेशद्वारावरच सुलभ शाैचालय!
By मुजीब देवणीकर | Published: November 18, 2023 12:52 PM2023-11-18T12:52:02+5:302023-11-18T12:54:38+5:30
टीकेची प्रचंड झोड; प्रशासनाने निर्णयात बदल करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर : महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या आत सुरक्षारक्षकांचा कक्ष आहे. त्याला लागून असलेल्या खुल्या जागेवर अत्याधुनिक सुलभ शौचालय बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शुक्रवारपासून कामाला सुरुवात होताच कर्मचाऱ्यांना ही बाब कळाली. कर्मचाऱ्यांनीही यावर तीव्र नाराजी दर्शविली. माजी पदाधिकाऱ्यांनी तर प्रशासनावर टीकेची झोड उठविली. प्रशासनाने त्वरित निर्णयात बदल करावा, अशी मागणी करण्यात आली.
महापालिकेत चार वर्षांपासून नगरसेवक, पदाधिकारी नाहीत. त्यामुळे सर्व निर्णय प्रशासनाला घ्यावे लागत आहेत. शासनाने यापूर्वी सार्वजनिक हिताच्या निर्णयात माजी पदाधिकाऱ्यांसोबत सल्लामसलत करावी, अशी सूचना केली होती. मात्र, कोरोना संसर्ग संपल्यावर प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमधील संवादही संपला. अलीकडेच प्रशासनाने जवळपास १० कोटी रुपये खर्च करून शहरात विविध ठिकाणी अत्याधुनिक शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला. महापालिका मुख्यालयातही चांगल्या शौचालयाची गरज होती. प्रशासनाने जुन्या इमारतीत प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला पार्किंगच्या जागेवर भव्य शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. शुक्रवारी अचानक कंत्राटदाराने काम सुरू केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. कर्मचाऱ्यांनी माहिती घेतली तर शौचालयाचे काम असल्याचे सांगण्यात आले. प्रवेशद्वारावर कुठे शौचालय असते का, अशा शब्दात कर्मचाऱ्यांनी नाराजी दर्शविली.
अशोभनीय निर्णय
शौचालय हे नेहमी कार्यालयाच्या पाठीमागे असते. प्रवेशद्वारवर नसते. महापालिकेत अनेक नागरिक, मोठे नेते, विदेशी पाहुणे येतात. दर्शनी भागात शौचालय घेणे योग्य नाही. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. अशोभनीय निर्णय प्रशासनाने त्वरित मागे घ्यावा. शौचालयासाठी आणखी दुसरी कोणती जागा बघावी. शेवटी या संस्थेसोबत आमची आस्था जोडलेली आहे.
- नंदकुमार घाेडेले, माजी महापौर
जागा बदलणे योग्य
शहराचे मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शौचालय बांधणे अतिशय चुकीचे आहे. प्रशासकांनी आपला निर्णय बदलावा. अन्यत्र जागेचा शोध घ्यावा. मुख्यालय परिसरात बरीच जागा आहे. प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक ३ येथे जागेचा शोध घ्यावा.
- बापू घडमोडे, माजी महापौर