बापरे! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोज ६ नवे टीबी रुग्ण, किती दिवसांपासून खोकला? लक्ष ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:37 IST2025-03-24T17:37:22+5:302025-03-24T17:37:53+5:30
जागतिक क्षयरोग दिन विशेष: वर्षभरात जिल्ह्यात तब्बल २ हजार ९७ नव्या रुग्णांची नोंद झाली.

बापरे! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोज ६ नवे टीबी रुग्ण, किती दिवसांपासून खोकला? लक्ष ठेवा
छत्रपती संभाजीनगर : नुसते टीबी म्हणजे क्षयरोगाचे नावही ऐकले तरी आजही अनेकांना धडकी भरते. देश क्षयरोगमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न केला जात आहे. तरीही जिल्ह्यात दररोज ५ ते ६ नवीन क्षयरुग्ण आढळत आहेत. वर्षभरात जिल्ह्यात तब्बल २ हजार ९७ नव्या रुग्णांची नोंद झाली.
‘टीबीमुक्त भारत’ अभियानानुसार २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने हेच उद्दिष्ट २०३० साठी निश्चित केले असले तरी भारताने हे लक्ष्य पाच वर्षे आधी साध्य करण्याचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे सांगितले जाते. या मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बीसीजी लसीकरणात मोठी कामगिरी केली गेली. महाराष्ट्रात सर्वाधिक ६५ टक्के बीसीजी लसीकरण हे जिल्ह्यात झाले आहे. दोन आठवड्यांहून अधिक कालावधीचा खोकला, हे क्षयरोगाचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे जाणवल्यास वेळीच खबरदारी घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
क्षयरोगाची प्रमुख लक्षणे
- सलग दोन आठवडे किंवा अधिक काळ खोकला
- छातीत वेदना आणि श्वास घेताना त्रास
- वजन अचानक कमी होणे
- रात्री घाम येणे आणि थकवा
उपचार यश दर ८९ टक्के
राज्यात नवीन क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात जिल्ह्याचा पाचवा क्रमांक आला आहे. याबरोबर जिल्ह्याचा टीबी उपचार यश दर ८९ टक्के असून, हा दर राज्यातील उत्कृष्ट कामगिरी दर्शवितो. रुग्णांच्या संपर्कातील सर्व कुटुंबीय, नातेवाईक, इतर व्यक्तींची तपासणी केली जाते. त्यातून क्षयरोगाचा संसर्ग वेळीच शोधून प्रतिबंधक उपाययोजना करता येतात.
-डाॅ. वैशाली डकले-पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी
वर्षभरात कुठे किती नवे क्षयरुग्ण? (२०२४)
तालुका- रुग्णसंख्या
छत्रपती संभाजीनगर- ५४५
गंगापूर- २४७
कन्नड- २२०
खुलताबाद- ११७
पैठण- २५२
फुलंब्री- १२७
सिल्लोड- २८८
सोयगाव- ८८
वैजापूर- २१३
एकूण- २०९७