अरे बापरे, सहा टक्के लोक मेंटल ! शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिक मानसिक ताणतणावात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 08:10 PM2022-07-01T20:10:24+5:302022-07-01T20:12:21+5:30
मानसिक आजाराची लक्षणे काय? जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत समाजातील सर्वच घटकांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे.
औरंगाबाद :आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजाराने त्रस्त आहेत. चार कुटुंबांतील किमान एक माणूस मानसिक आजारी असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीचे पूर्ण मानसिक संतुलन बिघडले तर त्या व्यक्तीला ‘मेंटल’ म्हणून हिणविले जाते. मात्र, वेळीच उपचार केला तर मानसिक आजार बरा होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटले.
जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत समाजातील सर्वच घटकांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. शहरी भाग मानसिक आजाराला बळी पडत असताना ग्रामीण भागातही मानसिक आजाराचे लोण पसरत आहे. शाळकरी मुले ते ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच मानसिक ताण-तणावाला सामोरे जावे लागते पण अजूनही मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेण्याची मानसिकता नाही.
चार कुटुंबांतील किमान एकजण
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार चार कुटुंबातील किमान एकजण मानसिक आजारी आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ नुसार, २० पैकी एक भारतीय व्यक्ती डिप्रेशनचा बळी ठरतो.
‘मेंटल’ची लक्षणे काय?
स्वत:विषयी भ्रामक कल्पना, अतिताण घेणे, सर्वजण माझ्याविरोधात आहे, असे सतत वाटणे, नशेच्या आहारी जाणे, चित्त एकाग्र न होणे, कामात चुका, ही लक्षणे आहेत. आजूबाजूच्या लोकांना ही व्यक्ती पूर्वीपेक्षा वेगळी वागत असल्याचे जाणवते.
मानसिक आजार वाढण्याला कारण काय?
अनुवंशिकता, अतितणाव, नशेच्या पदार्थांचे सेवन, झोप कमी होणे, झेपत नाही अशी कामे करणे, ही काही कारणे मानसिक आजारवाढीला कारणीभूत ठरतात. बेरोजगारी, शिक्षण, घरगुती अडचणी, व्यसनाधीनता नैराश्यामागील कारणे आहेत.
कोणी तपासण्या करून घ्यायला हव्यात?
मानसिक आजाराची कोणतीही लक्षणे जाणवत असेल आधी जवळच्या व्यक्तीशी, कुटुंबीयांशी मनमोकळे बोलले पाहिजे. आवश्यक वाटल्यास फॅमिली फिजिशियनचा सल्ला घेतला पाहिजे तरीही फरक पडत नसेल तर वेळीच शेवटी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सहानुभूतीने पाहावे मनोरुग्णांकडे सहानुभूतीने पाहावे. आजार अंगावर काढता कामा नये. घाटीत मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागात मानसिक आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जातात.
- डाॅ. प्रसाद देशपांडे, मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागप्रमुख, घाटी
ओपीडीत वाढ
बाह्यरुग्ण विभागात मानसिक आजारांच्या रुग्णांची संख्या गेल्या दिवसांत वाढलेली आहे. नैराश्य, चिंता यासह काही मानसिक आजार समुपदेशनाने बरे होतात. पाचपैकी एक व्यक्ती नैराश्यग्रस्त असते.
- डाॅ. महेश मरकड, चिकित्सालयीन मानसतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय