अहो आश्चर्यम! कर्ज वाटपासाठी बँका फुटपाथवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 05:12 PM2019-03-08T17:12:05+5:302019-03-08T17:15:07+5:30
तात्काळ अर्ज आणि ऑनलाईन कागदपत्रांच्या आधारे झटपट ‘पर्सनल लोन’
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : ‘पितळी ठेवून कोणी खडकू देईना राव’, असा जुन्या जमान्यात वाक्प्रचार होता. दुष्काळात कर्ज देण्यासाठी फुटपाथवर आलेल्या बँकांचा नवीन फंडा पाहून ‘नागरिकांनीही तोंडा’त बोट घालण्याची वेळ आली आहे; परंतु ऑनलाईन सुविधांमुळे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी तात्काळ करून अर्ज आणि झटपट कर्ज असेच चित्र शहरातील रस्तोरस्ती सध्या दिसते आहे. बँकांच्या या रस्त्यावरील कर्ज मेळाव्यात विचारपूस करण्यासाठी तोबा गर्दी उसळते आहे.
कर्ज घेण्यासाठी बँकात फेऱ्या मारून नागरिकांच्या चपला झिजवाव्या लागतात. सध्याही शासकीय योजनांतून कर्ज प्रकरण मंजुरीसाठी बँकांसमोर मंडप पडलेले आहेत. बँकाही कागदपत्रात त्रुटी काढून कर्ज प्रकरणे नामंजूर करतात किंवा स्वयंरोजगाराचा बँकेतील व्यवहार पाहून त्याचे कर्ज प्रकरण मंजूर केले जाते. हे सर्व पाहून अनेकदा नको ते कर्ज म्हणणारे कमी नाहीत; परंतु ‘तीन मिनिटांत कर्ज तुमच्या खात्यात’, असा सिडको एन-६ स्मशानभूमीसमोरील फलक पाहून उत्सुकतेने नागरिक तेथे गर्दी करीत आहेत. इच्छुक नागरिकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक तपासून बँकेच्या नियम व अटीत बसत असेल तर खरेच, तीन मिनिटांत तुमच्या बँक खात्यात पर्सनल लोनची रक्कम जमा होते आहे.
महिन्याला १ टक्का व्याजदराने म्हणजेच दरसाल दर शेकडा १२ टक्के दराने हे कर्ज परतफेड करावे लागणार आहे. आता कर्जासाठी तारण नाही, बँकेतील तुमच्या आर्थिक व्यवहारानुसार कर्ज मंजूर करण्यासाठी येथे उपस्थित बँक कर्मचारी उत्सुक आहेत.
दुष्काळसदृश परिस्थितीत झटपट कर्ज
बँक खात्यात कर्जाची रक्कम ऑनलाईन झटपट वर्ग केली जात असल्याने ‘ये क्या हो रहा है,’ असे म्हणत प्रत्येक जण येथे थांबून कर्ज प्रकरणासाठी विचारपूस करताना दिसत होता. काही जण तुमचे कार्यालय कुठे आहे, तुम्ही असे रस्त्यावर बाजारात थांबल्यासारखे का थांबलात, अशा प्रश्नांचा भडिमारही करीत होते. अॅप डाऊनलोड करून तुम्हीही स्वत: कर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता; परंतु आॅनलाईन पैसे पळवापळवी होत असल्याने नागरिकांची द्विधावस्था दिसत होती.