अरे व्वा! आता गावातही होणार कचरा संकलन, बचत गट घेणार जबाबदारी
By विजय सरवदे | Published: November 25, 2023 07:23 PM2023-11-25T19:23:40+5:302023-11-25T19:24:13+5:30
पहिल्या टप्प्यात जि.प. राबविणार ७७ गावांत उपक्रम
छत्रपती संभाजीनगर : शहराप्रमाणे आता गावेही स्वच्छ दिसावीत, या दिशेने जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यात ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७७ गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून बचतगटांच्या माध्यमातून घरोघरी जावून कचरा संकलित केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतींच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेसोबत लवकरच करार केला जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विकस मीना यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प.तील स्वच्छ भारत मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले व त्यांची टीम परिश्रम घेत आहे. गावात रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत कचरा विखुरलेला असतो. सांडपाणी रस्त्यावर पसरलेले असते. त्यामुळे अनेकदा डास, माशा, चिलटे, अळ्यांमुळे आरोग्याची समस्या उद्भवते. गावेही स्वच्छ झाली पाहिजेत. तिथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, या हेतूने स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशन कक्षाने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर दिला आहे. सांडपाणी व्यवस्थापनावर बऱ्यापैकी कामे सुरू आहेत. पण, गावातील कचरा इकडे- तिकडे न टाकता तो एकाच ठिकाणी जमा व्हावा व त्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. कचरा संकलित करतानाच ओला व सुका असे वर्गीकरण केले जाईल. १५ डिसेंबरपर्यंत हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावात तो राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी सांगितले.
बचत गट करतील कचरा जमा
जिल्ह्यात ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७७ गावांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन संकलित केला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत कचरा विलगीकरण शेड उभारले जाणार असून या शेडमध्ये पाच हौद असतील. त्यात काच, रबर, प्लास्टिक, मेडिकल वेस्ट (सॅनिटेरी नॅपकीन वैगरे) व अन्य असे कचऱ्याचे वर्गीकरण करून टाकला जाईल. तो कचरा मनपाच्या प्रक्रिया सेंटरपर्यंत नेण्याचे कामही ग्रामपंचायतीला करावे लागणार आहे. यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी सातत्याने बैठका घेऊन ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामसेवकांची मानसिकता तयार केली आहे.