अरे व्वा! तुमचा जबडा आईसारखा, दात वडिलांसारखे!
By संतोष हिरेमठ | Published: December 12, 2023 04:26 PM2023-12-12T16:26:23+5:302023-12-12T16:27:26+5:30
अक्कलदाढ देते त्रास, वर्षभरात शेकडो अक्कलदाढा काढण्याची वेळ
छत्रपती संभाजीनगर : जन्मत: कुणाला जबड्याची रचना आईकडून आणि दातांचा आकार हा वडिलांकडून मिळतो. तर कुणाच्या जबड्याची रचना ही वडिलांकडून आणि दातांचा आकार हा आईकडून मिळतो. परिणामी, आनुवंशिक रचनेमुळे ८० टक्के रुग्णांच्या अक्कलदाढेला जागाच नसते. त्यामुळे ती वाकडीतिकडी येते आणि वेदनेमुळे ती काढावी लागते. एकट्या शासकीय दंत महाविद्यालयात वर्षभरात ३,५०० अक्कलदाढा काढण्यात आल्या.
एखाद्या व्यक्तीला शेवटचे चार दात येण्यास सुरुवात होते, त्यांना ‘अक्कलदाढ’ असे म्हटले जाते. वैद्यकीय भाषेत ‘विस्डम टीथ’ असे म्हटले जाते. अक्कलदाढ असे म्हटले जात असले तरी त्यांचा अक्कल, हुशारी आणि बुद्धीशी काहीही संबंध नसतो. त्यांच्या रचनेमुळे मात्र चांगले मौखिक आरोग्य असणाऱ्या लोकांनाही त्यांचा त्रास होतो. त्यामुळे त्या काढण्याचीही वेळ ओढवते, असे तज्ज्ञांनी म्हटले.
...तर काढावी लागते
वर्षभरात साधारणपणे ३,२०० ते ३,५०० अक्कलदाढा काढल्या जातात. यातील काही अक्कलदाढा तोंडामध्ये उगवलेल्या असतात, तर काही अक्कलदाढा या हिरडीच्या आत असतात. अक्कलदाढा साधारणपणे वयाच्या १८ ते २२ व्या वर्षी येतात. सर्वसाधारणपणे या वयात शहाणपण येते किंवा समजू लागते म्हणून या दाढांना ‘अक्कलदाढा’ म्हणतात. प्रत्येकाची अक्कलदाढ काढावीच लागते असे नाही. रुग्णांची तक्रार असेल, अक्कलदाढेला सूज येत असेल, दुखत असेल, अक्कलदाढ वेडीवाकडी असेल तर मात्र काढावी.
- डाॅ. माया इंदूरकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय
८० टक्के लोकांना आनुवंशिक रचनेमुळे त्रास
अक्कलदाढेची समस्या असणाऱ्यांपैकी ८० टक्के लोकांना त्रास हा आनुवंशिक रचनेमुळे होतो. कारण आनुवंशिकतेमुळे कुणाला जबड्याची रचना आईकडून आणि दाताचा आकार हा वडिलांकडून मिळतो, तर कुणाच्या जबड्याची रचना ही वडिलांकडून आणि दातांचा आकार हा आईकडून मिळतो. अक्कलदाढेची समस्या असणाऱ्यांच्या अक्कलदाढा अडकलेल्या, वाकड्या-तिकड्या असतात. त्यामुळे वेदना होत असल्याने अक्कलदाढ काढण्याची वेळ ओढावते.
- डाॅ. प्रीतम शेलार, अध्यक्ष, इंडियन डेंटल असोसिएशन
- जिल्ह्यातील एकूण डेंटिस्ट- ५५०
- अनेकांना वयाच्या २५ ते ३० व्या वर्षी अक्कलदाढ येते.
- अक्कलदाढ काढल्यानंतर व्यक्तीला दृष्टिदोष येतो, हा गैरसमज.