तेल कंपन्यांनाच लावले ‘तेल’; मनमाडहून येणाऱ्या टँकरमधून रस्त्यातच पेट्रोल व डिझेलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 06:44 PM2020-10-29T18:44:30+5:302020-10-29T18:46:19+5:30
धूळे-सोलापूर महामार्गावरील बंद पडलेल्या ढाब्यापासून १० मीटर अंतरावर इंधन चोरीचा प्रकार सुरू होता.
औरंगाबाद : सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून डिझेल चोरून विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने जांभाळा येथे धाड टाकून पर्दाफाश केला. या कारवाईत ६ जणांना ताब्यात घेण्यात आले. टँकर, स्कॉर्पिओ जीप आणि ७ ड्रम, डिझेलच्या कॅन, असा सुमारे ४० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
नाशिक येथील पेट्रोल, डिझेल केंद्रावरून मराठवाड्यातील अनेक पंपांवर इंधन पुरवठा केला जातो. इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांना हाताशी धरून त्यातील पेट्रोल, डिझेल जांभाळा शिवारात काढण्यात येते. त्यानंतर हे इंधन अन्य वाहनचालकांना विक्री केले जाते. याचे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या विशेष पथकाला मिळाली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, हवालदार इमरान पठाण, मनोज विखणकर, विजय निकम, विनोद पवार, विठ्ठल आडे यांच्या पथकाने जांभाळा शिवारातील संशयित भूखंडावर धाड टाकली. तेव्हा तेथे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून डिझेल काढण्याचे काम सुरू होते. तेथे असलेल्या सहा जणांनी पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हायवेपासून १० मीटर अंतरावर अड्डा
धूळे-सोलापूर महामार्गावरील बंद पडलेल्या ढाब्यापासून १० मीटर अंतरावर इंधन चोरीचा प्रकार सुरू होता. तेथे २४ तासांत आठ ते दहा टँकर येऊन उभे राहत. शासनाने लावलेले अधिकृत सील तोडून टँकरमधील पेट्रोल अथवा डिझेल काढले जात असल्याचे निदर्शनास आले.
पुरवठा अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद
या कारवाईनंतर पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तालुका पुरवठा अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून या कारवाईची माहिती दिली. पंचनामा करून पुढील कारवाई करण्यासाठी येण्यास सांगितले. मात्र, या अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद केल्याचे समोर आले.
मुख्य आरोपी इलियाससह ६ जणांना अटक
टँकरचालकाकडून डिझेल खरेदी करून विक्री करणारा अड्डा चालक इलियास खान आजम खान (५४, रा. लोटाकारंजा) याच्यासह टँकरचालक शेख अब्दुल्ला शेख अहमद (४०, रा. लिपाणी आडगाव), साजेद खान साहेब खान (३०, रा. कैसर कॉलनी), शेख जाहेद शेख हमीद (२५, बायजीपुरा), शेख मुक्तार वजीर शेख (बालानगर), अश्फाक हुसेन हुसेनभाई (४८, रा. लोटाकारंजा) या आरोपींना पोलिसांनी अटक केली.
अशी व्हायची विक्री
आरोपी टँकरचालकाकडून निम्म्या दराने डिझेल खरेदी करून ६० रुपये प्रति लिटरप्रमाणे ते विक्री करीत असत. आरोपी एका ग्राहकाला कमीत कमी ३५ लिटरच्या कॅनचीच विक्री करीत असत. जेसीबी, हायवाचालक आणि जडवाहनमालक त्यांचे ग्राहक होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याशिवाय आज तेथे डिझेल खरेदी करण्यासाठी आलेला स्कॉर्पिओ चालकही पोलिसांच्या हाती लागला. रोख रकमेसह ४० लाख ११ हजार ५२३ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला.