दारु पिताना जुने वाद उफाळून आले; संतापात तरुणाची चाकू खुपसून हत्या
By सुमित डोळे | Published: March 27, 2024 07:47 PM2024-03-27T19:47:23+5:302024-03-27T19:47:50+5:30
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरू आहे
छत्रपती संभाजीनगर : दारु पिताना जुने वाद उफाळून आल्याने चिकलठाणा केंब्रिज रस्त्यावर चेतन संजय गिरी (२३, रा. चिकलठाणा) या तरुणाची क्रुर हत्या करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्री २ वाजता हि घटना घडली. मित्रांसोबतच्याच जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.
एमआयडिसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन त्याचा मित्र अमोल ताठे सोबत दारु पिण्यासाठी गेला होता. रात्री १ वाजता चिकलठाण्यात राहणारा नवनाथ दहिहंडेने संपर्क करुन त्यांना जाऊन भेटला. तिघांनी पुन्हा सोबत दारु पिणे सुरू केले. मात्र, जुन्या वादातून दहिहंडे व चेतन मध्ये वाद सुरू झाले. अमोल त्यांना समजून सांगत होता. मात्र, त्यांच्यात चांगलीच धक्काबुक्की झाली. दहिहंडेने शांत होण्याचे नाटक करत छावणीतील विनोद सुर्यवंशी व पवन मिसाळला कॉल करुन दारु पित असलेल्या ठिकाणी बोलावून घेतले.
पाचही जणांनी पुन्हा सोबत दारु पिण्यास सुरूवात केली. मात्र, त्यांच्यात वाद पुन्हा वाद पेटले. काही क्षणात वाद टोकाला गेले व दोन वाजेच्या सुमारास पवन, विनोद व दहिहंडे ने चेतनला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तेवढ्यात विनोदने कंबरेत लपवलेला धारधार चाकू काढून थेट चेतनच्या पोटात खुपसला. चेतन क्षणार्धात रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. अमोलने त्याला वाचवण्यासाठी धाव घेताच झटापटीत त्याला पाठीत चाकू लागला. त्यानंतर विनोद व पवनने दुचाकीवरुन पळ काढला. तर अमोलने मित्रांना संपर्क करुन चेतनला जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत चेतनचा मृत्यू झालेला होता.
तीन वाजेच्या सुमारास घटनेची माहिती कळताच एमआयडिसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी धाव घेतली. घटना समजून घेत त्यांनी तत्काळ आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले. अंमलदाप प्रकाश घुगे यांच्यासह अंमलदार प्रकाश सोनवणे, संतोष सोनवणे यांनी सूत्र हलवत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दहिहंडे व मिसाळला ताब्यात घेतले. तर सायंकाळी उशिरापर्यंत विनोदचा शोध सुरू होता.