जुन्या पुलांचे आॅडिट सुरू
By Admin | Published: August 6, 2016 12:12 AM2016-08-06T00:12:10+5:302016-08-06T00:14:15+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील जुन्या ब्रिटिश व निजामकालीन पुलांचे आॅडिटचे काम हाती घेण्यात आले आहे. ई-मेलने अहवाल पाठवा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्यातील जुन्या ब्रिटिश व निजामकालीन पुलांचे आॅडिटचे काम हाती घेण्यात आले आहे. ई-मेलने अहवाल पाठवा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आल्या आहेत. जिल्हानिहाय मराठवाड्यात आॅडिट करण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. मराठवाड्यात ८१ पूल आहेत. यामध्ये काही ब्रिटिश तर काही निजामकालीन आहेत. जालन्यातील लोखंडी पूल, पूर्णा येथील पूल, हे अती जुने पूल सध्या विभागात आहेत. मराठवाड्यात मागील २० वर्षांत बांधलेल्या पुलांचेदेखील स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे.
ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांच्या मुदतीचा अहवाल दरवर्षी येत असतो. शिवाय पुलाला काही झाल्यास स्थानिक नागरिकही कळवीत असतात. पुलाची क्षमता तपासण्यासाठी यंत्रणाच नसल्याने जागरूक नागरिकांनी केलेला पत्रव्यवहार कचऱ्यात जमा होतो.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ब्रीज इन्स्पेक्शन्स रेफरन्स मॅन्युअल १९९८ नुसार पुलांच्या देखभालीसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. नियमित, पायाभूत, विशेष तसेच पाण्याखालील तपासणी, अशा श्रेणी आहेत. ३० मीटरसाठी कनिष्ठ अभियंता, २०० मीटरपर्यंतच्या तपासणीसाठी कार्यकारी अभियंता व त्यावरील तपासणीसाठी अधीक्षक अभियंता तपासणीसाठी असणे गरजेचे आहे.
विभागात काही निजाम तर काही ब्रिटिशकालीन पूल आहेत. औरंगाबादमध्ये कन्नड, शहागड, पैठण (आपेगाव), छावणी लोखंडी पूल, महेमूद दरवाजा, बारापुल्ला दरवाजा, मकई दरवाजा, नागेश्वरवाडी, कायगाव टोका, अजिंठा येथील पूल जुने आहेत.
अधीक्षक अभियंता म्हणाले.....
आॅडिटप्रकरणी अधीक्षक अभियंता ए. बी. सूर्यवंशी यांनी सांगितले, शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी दुपारपर्यंत काही महत्त्वाच्या पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल येणे शक्य आहे. मराठवाड्यातील अहवालदेखील तातडीने मिळावेत, अशा सूचना उपविभागीय पातळीवर करण्यात आल्या आहेत. जिल्हानिहाय दोन पथके नेमण्यात आली आहेत.