जुन्या शहरातील रुंदीकरण कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:00 AM2018-06-19T01:00:53+5:302018-06-19T01:01:25+5:30
जुन्या शहरातील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी महापालिकेने घोषणा केली होती. निवडक रस्ते रुंद करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते. महापालिकेतील नगररचना विभागाने एका महिन्यात कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जुन्या शहरातील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी महापालिकेने घोषणा केली होती. निवडक रस्ते रुंद करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते. महापालिकेतील नगररचना विभागाने एका महिन्यात कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानंतर धार्मिक स्थळांना मोबदला देण्यासाठी खास शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.
दिवाण देवडी, सिटीचौक ते गुलमंडी, औरंगपुरा ते मोतीकारंजा या भागातील रस्ते रुंद करण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. १५ दिवसांत रस्त्यांचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करावे, रुंदीकरणातील धार्मिक स्थळांना मोबदला देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नगररचना विभागाने काहीच कारवाई न केल्याने जुन्या शहरातील रस्त्यांचा प्रश्न जशास तसा आहे.
२०११-१२ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जुन्या शहरातील ११ पेक्षा अधिक रस्ते रुंद केले होते. महापालिकेच्या तिजोरीत फक्त चार कोटी रुपये असतानाही त्यांनी व्यापक रस्ते रुंदीकरण मोहीम हाती घेतली होती. ज्या मालमत्ताधारकांनी जागेवर मोबदला मागितला तरी त्याला देण्याची तयारी मनपाने दर्शविली होती.
महापालिकेने नंतर सर्व मालमत्ताधारकांना टीडीआर, एफएसआय दिला होता. मागील ७ वर्षांमध्ये जुन्या शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळही प्रचंड वाढली आहे. त्यातच अरुंद रस्त्यावर अतिक्रमणेही तेवढीच वाढली आहे.
जुन्या शहरातील काही रस्त्यांचा श्वास मोकळा केला असला तरी अद्याप काही रस्त्यांवर धार्मिक स्थळे जशास तशी उभी आहेत, तर काही रस्त्यांचे रुंदीकरणच झालेले नाही. दिवाण देवडी, सिटीचौक ते गुलमंडी, औरंगपुरा ते मोतीकारंजा या रस्त्यावर चार धार्मिक स्थळांचा अडथळा असल्याने मोबदला देण्याचा विषय प्रलंबित आहे.